
US-Russia Agreement
Plutonium Disposal Agreement: रशियाने अमेरिकेसोबतचा त्यांचा दीर्घकाळ चाललेला प्लुटोनियम विल्हेवाट करार औपचारिकपणे रद्द केला आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी करार रद्द करणाऱ्या कायद्यावर स्वाक्षरी केली. ज्यामुळे हा करार आता पूर्णपणे निष्क्रिय झाला आहे. अण्वस्त्रांमध्ये वापरल्या जाणाऱ्या शस्त्रास्त्र-ग्रेड प्लुटोनियमच्या विल्हेवाटीसाठी दोन्ही देशांदरम्यान २००० मध्ये हा करार झाला होता. पण हा करार रद्द झाल्याने रशिया आणि अमेरिका यांच्यातील तणाव अधिकच चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
या करारानुसार, रशिया आणि अमेरिकेला ३४ टन शस्त्रास्त्र-ग्रेड प्लुटोनियमची विल्हेवाट लावण्यात येत होती. त्यावेळी शीतयुद्धानंतर अण्वस्त्रांच्या शर्यतीवर नियंत्रण ठेवण्यासाठी हा करार एक महत्त्वाचे पाऊल मानले जात होते. पण गेल्या काही वर्षा रशिया आणि अमेरिका या दोन्ही देशांमधील संबंधांमध्ये बिघाड झाल्यामुळे करार कमकुवत झाला आहे.
रशियन संसदेच्या कनिष्ठ सभागृह, ड्यूमाने या महिन्याच्या सुरुवातीला विधेयकाला मंजुरी दिली आणि त्यानंतर वरिष्ठ सभागृह, फेडरेशन कौन्सिलनेही हे विधेयक मंजूर केले. सोमवारी पुतिन यांनी या विधेयकावर स्वाक्षरी केली कायदा अंमलात आला. रशियाने यापूर्वी २०१६ मध्येही या कराराला स्थगिती दिली होती. त्यावेळी रशियाने अमेरिकेची “शत्रुत्वाची धोरणे” आणि रशियाविरुद्धचे निर्बंध अशी कारणे दिली होती. पण आता हा करार पूर्णपणे संपुष्टात आला आहे. ज्यामुळे रशियाची राजधानी मॉस्को त्यांच्या अणु धोरणाबाबत अधिक आक्रमक भूमिका घेऊ शकते, असेही सूचित झाले आहे.
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी संसदेत भाषण करताना जाहीर केले की देशाने एक लहान अणुऊर्जा युनिट विकसित केले आहे, जे क्रूझ क्षेपणास्त्रांमध्ये बसवले जाऊ शकते. या तंत्रज्ञानामुळे क्षेपणास्त्रांची श्रेणी अनिश्चित काळासाठी वाढवणे शक्य होईल, ज्यामुळे पारंपारिक क्षेपणास्त्र प्रणालींपेक्षा हे तंत्रज्ञान खूपच प्रगत ठरेल.
पुतिन यांनी सांगितले की, रशियाचे नवीन अणुऊर्जेवर चालणारे “बुरेवेस्टनिक” क्रूझ क्षेपणास्त्र आता तैनातीसाठी तयार आहे. या क्षेपणास्त्राने चाचणीदरम्यान तब्बल १५ तास उड्डाण करत सुमारे १४,००० किलोमीटर (८,७०० मैल) अंतर पार केले. पुतिन यांच्या मते, जगातील कोणत्याही देशाकडे असे क्षेपणास्त्र नाही.
रशियन संरक्षण तज्ञांच्या मते, या निर्णयाद्वारे रशियाने पाश्चात्य देशांना स्पष्ट संदेश दिला आहे की आता तो कोणत्याही प्रकारचा सामरिक दबाव सहन करणार नाही. विश्लेषकांचे मत आहे की या हालचालीमुळे रशिया-युक्रेन शांतता प्रयत्नांवर परिणाम होऊ शकतो. अमेरिका आणि युरोपीय देशांनी लादलेल्या निर्बंधांच्या पार्श्वभूमीवर, रशियाचा हा निर्णय जागतिक अणुसंतुलन डळमळीत करू शकतो.