फोटो सौजन्य: Freepik
सध्या भारतीय मार्केटमध्ये अनेक बाईक्स लाँच होताना दिसत आहे. एकेकाळी फक्त पेट्रोल बाईक्सचा बोलबाला होत असताना आता इलेक्ट्रिक बाईक्स लाँच होताना दिसत आहे. नुकतेच बजाज कंपनीने जगातील पहिली सीएनजी बाईक लाँच केली आहे.
जर तुम्ही या नवीन बाईक्सकडे नीट लक्षपूर्वक पाहिले तर तुम्हाला जाणवेल या सर्व बाईक्समध्ये डिस्क ब्रेकची सुविधा देण्यात आली आहे. तसेच काही बाईक्समध्ये ड्रम ब्रेकसुद्धा दिला जातो. काहीवेळेस तर बाईक चालक स्वतः आपल्या बाईकसाठी ब्रेक्स निवडत असतात.
बाईक विकत घेताना, ब्रेकिंग सिस्टीमची निवड खूप महत्त्वाची असते, कारण त्यामुळे तुमची सुरक्षितता आणि बाईकची कार्यक्षमता या दोन्ही गोष्टींवर त्याचा परिणाम होत असतो. कोणता पर्याय चांगला आहे हे समजून घेण्यासाठी आपण ड्रम ब्रेक आणि डिस्क ब्रेक यांच्यात तुलना करून पाहूया:
ड्रम ब्रेकमध्ये एक गोलाकार ड्रम असतो ज्यामध्ये ब्रेक शूज बसवले जातात. जेव्हा तुम्ही ब्रेक लावता तेव्हा शूज ड्रमच्या आतील भागात घर्षण निर्माण होते, ज्यामुळे बाईक थांबते.
ड्रम ब्रेकची किंमत ही कमी असते, ज्यामुळे ते किफायतशीर पर्याय बनतात. या ब्रेक्सची तुम्हाला कमी-देखभाल करावी लागते. ज्यामुळे ड्रम ब्रेक साधारणपणे सोपे आणि कमी खर्चिक बनतात.
ड्रम ब्रेक डिस्क ब्रेकपेक्षा कमी प्रभावी असतात, विशेषत: जास्त वेगाने बाईक चालवताना त्यांचा प्रभाव कमी होण्याची शक्यता असते. तसेच ड्रम ब्रेक्स सतत जास्त काळ वापरल्यास ते जास्त गरम होऊ शकतात, ज्यामुळे त्यांची ब्रेकिंग कार्यक्षमता कमी होते.
डिस्क ब्रेकमध्ये डिस्क (रोटर) असते जी चाकासोबत फिरते. जेव्हा तुम्ही ब्रेक लावता, तेव्हा कॅलिपरमधील पॅड डिस्कला दाबतात, ज्यामुळे बाईक त्वरीत थांबते.
डिस्क ब्रेक अधिक प्रभावी ब्रेकिंग प्रदान करतात, विशेषत: उच्च गती आणि कठीण परिस्थितीत या ब्रेकचा वापर केल्यास बाईक त्वरित थांबते. डिस्क ब्रेकला जास्त गरम होण्याचा धोका कमी असतो. याव्यतिरिक्त डिस्क ब्रेकचे वजन कमी असते, ज्याचा बाईकच्या परफॉर्मन्सवर सकारात्मक परिणाम होतो.
डिस्क ब्रेक तुमच्या खिशाला चालीचं कात्री लावू शकतात. ड्रम ब्रेकपेक्षा डिस्क ब्रेक किंचित महाग असतात. तसेच त्यांची देखभाल करणे सुद्धा थोडे कठीण असते.
जर तुम्ही सामान्य वापरासाठी बाईक खरेदी करत असाल आणि तुमचा बजेट सुद्धा कमी असेल, तर ड्रम ब्रेक हा तुमच्यासाठी एक चांगला पर्याय असू शकतो. त्याच वेळी, जर तुम्हाला उच्च कार्यक्षमता हवी असेल. जसे की स्पोर्ट्स बाइक किंवा हायवे राइडिंगसाठी, तर डिस्क ब्रेक अधिक योग्य ठरतील. दोन्ही ब्रेकिंग सिस्टीमचा वापर सुद्धा तुम्ही करू शकता, जेथे तुम्ही समोरच्या चाकावर डिस्क ब्रेक आणि मागील चाकावर ड्रम ब्रेक आहे.