फोटो सौजन्य: iStock
अनेक ऑटो कंपन्या आहेत, ज्या आगामी काळात कशा कार लाँच केल्या पाहिजेत, याबद्दल अभ्यास करत आहे. यातही कंपन्यांचे लक्ष जास्तकरून इलेक्ट्रिक कार्सच्या उत्पादनावर लक्षकेंद्रित करत आहे. आता लवकरच आघाडीची ऑटो कंपनी Hyundai Motors ने त्यांचा फ्युचर प्लॅन सादर केला आहे.
2030 पर्यंत 18 हून अधिक हायब्रिड मॉडेल्स लाँच करणार असल्याचे ह्युंदाईने जाहीर केले आहे. या 18 मॉडेल्समध्ये लक्झरी ब्रँड Genesis चा देखील समावेश आहे. कंपनी चांगल्या मायलेजसाठी प्रगत TMED-II तंत्रज्ञानासह ह्युंदाई पॅलिसेड हायब्रिड देखील लाँच करणार आहे. तसेच भारतीय बाजारपेठेसाठी विशेष तयारी देखील केली जात आहे.
ह्युंदाई देशातील पहिली इलेक्ट्रिक कार सादर करेल, जी विशेषतः स्थानिक ड्रायव्हर्ससाठी डिझाइन केलेली आहे. ती परवडणारी आणि सोयीस्कर असेल. कंपनीने हायब्रिड, ईव्ही, लक्झरी कार आणि पिकअप ट्रकसाठी जागतिक रोडमॅपची योजना देखील आखली आहे, ज्यामध्ये सुधारित बॅटरी, फ्यूचरिस्टिक डिझाइन, अपडेटेड सॉफ्टवेअर आणि लोकल मॅन्युफॅक्चरिंग यांचा समावेश आहे.
ह्युंदाई सध्या एक्सटेंडेड रेंज ईव्ही (EREVs) वरही काम करत आहे. या तंत्रज्ञानाच्या मदतीने कंपनी अशा कार बाजारात आणू शकते ज्यामध्ये एका चार्जमध्ये तब्बल 960 किमीपर्यंतची ड्रायव्हिंग रेंज मिळेल. यामध्ये लहान आणि किफायतशीर बॅटऱ्या असतील, त्यामुळे रेंजची चिंता करावी लागणार नाही. याशिवाय, Hyundai च्या हाय-परफॉर्मन्स N लाइनअपचा विस्तार होणार असून, कंपनी IONIQ 6 N प्रगत ड्रायव्हिंग मोड्ससह आणण्याची तयारी करत आहे.
तंत्रज्ञानाच्या दृष्टीने पाहिल्यास, ह्युंदाई सध्या सॉफ्टवेअर-डिफाइंड व्हेईकल्स (SDVs), रोबोटिक्स-आधारित उत्पादन कारखाने, व्हॉइस कंट्रोल आणि ऑटोनॉमस ड्रायव्हिंगसाठी AI तसेच ॲप स्टोअर आणि पर्सनलायझेशनसह नव्या Pleos इन्फोटेनमेंट सिस्टम यावर पूर्ण लक्ष केंद्रित करत आहे. बॅटरीमधील नवकल्पनांमुळे 30% पर्यंत खर्च कमी होणार असून, प्रगत फायर-प्रिव्हेन्शन सिस्टीममुळे सुरक्षेत मोठी सुधारणा होईल.
ह्युंदाईचा लक्झरी ब्रँड Genesis देखील 2026 मध्ये Genesis Magma Racing सोबत मोटरस्पोर्टमध्ये पदार्पण करत आहे आणि 2030 पर्यंत दरवर्षी 3.5 लाख युनिट्सची विक्री साध्य करण्याचे लक्ष्य ठेवले आहे. Waymo, GM आणि Amazon Autos यांच्याशी झालेल्या धोरणात्मक भागीदारीमुळे ऑटोनॉमस तंत्रज्ञान, संयुक्त वाहन विकास आणि आधुनिक ऑनलाइन खरेदीचे पर्याय उपलब्ध होणार आहेत.
यासोबतच, ह्युंदाईचे मुख्य वित्त अधिकारी सिओंग जो (स्कॉट) ली यांनी 2026 ते 2030 दरम्यान तब्बल 77.3 ट्रिलियन KRW (सुमारे ₹4.7 लाख कोटी) गुंतवणुकीची पुष्टी केली आहे. या गुंतवणुकीचा मुख्य भर R&D, भविष्यातील तंत्रज्ञान आणि अमेरिकेतील मॅन्युफॅक्चरिंग यावर असणार आहे.