
HSRP Number Plate नाही? 'इतका' मोठा दंड भरायला तयार राहा!
आतापर्यंत 5 वेळा मुदतवाढ देऊनही सोलापूर जिल्ह्यातील 9 लाख 26 हजार 831 वाहनांपैकी 7 लाख 26 हजार 918 वाहने एचएसआरपी शिवाय धावत आहेत. आता राज्य सरकारकडून 30 नोव्हेंबरपर्यंत वाहनधारकांना एचएसआरपी (HSRP) नंबरप्लेट बसविण्याची अंतिम मुदत देण्यात आली आहे. मात्र, सध्याच्या घडीला एकूण वाहनांपैकी सुमारे 75 टक्के वाहने अजूनही या नंबरप्लेटशिवाय रस्त्यावर धावत आहेत.
मुदत संपल्यानंतर, मोटार वाहन कायद्यातील कलम 177 अंतर्गत पहिल्यांदा 1000 रुपयांचा दंड होणार असून, पुढील प्रत्येकवेळी 1500 रुपयांचा दंड आकारला जाईल, अशी माहिती आरटीओ अधिकाऱ्यांनी दिली आहे.
अपघात किंवा गुन्ह्यांमध्ये सामील असलेल्या वाहनांचा माग काढणे सुलभ व्हावे आणि प्रत्येक वाहन अधिक सुरक्षित राहावे, या उद्देशाने एचएसआरपी नंबरप्लेट अनिवार्य करण्यात आली आहे. ही अट 1 एप्रिल 2019 पूर्वी नोंदणीकृत सर्व वाहनांसाठी लागू आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, अनेक गुन्हे आणि अपघातातील वाहने या नंबरप्लेटच्या साहाय्याने सहज ओळखता येतात.
सोलापूर जिल्ह्यातील सुमारे 2 लाख वाहनधारकांनी आतापर्यंत एचएसआरपी नंबरप्लेट बसवून घेतली आहे. मात्र, मुदतवाढ मिळूनही अनेकांनी अजूनही त्याकडे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे राहिलेल्या वाहनधारकांसाठी डिसेंबर 2025 किंवा जानेवारी 2026 पर्यंत पुन्हा मुदतवाढ देण्याची शक्यता आहे. सध्या एकूण वाहनांपैकी केवळ 25 टक्के वाहनांनीच ही नंबरप्लेट बसवून घेतली आहे.
अनेक वाहनधारक नंबरप्लेटवर छेडछाड करतात, काहीजण त्यावर विविध शब्द लिहितात तर काहीजण अंकांचे आकार बदलतात. अशा प्रकरणात पहिल्यांदा 500 रुपयांचा दंड आकारला जातो, तर फॅन्सी नंबरप्लेट असल्यास 100 रुपयांचा दंड होतो. काही वाहनचालक हा दंड तत्काळ भरतात, तर काहीजण तो नेहमी टाळतात. मात्र, पुन्हा त्याच वाहनावर कारवाई झाल्यास दंडाची रक्कम तिप्पट म्हणजेच 1500 रुपये होते.
सर्व वाहनधारकांनी एचएसआरपी नंबरप्लेट लावून घ्यावी, असे आवाहन सोलापूर शहराचे सहाय्यक पोलिस आयुक्त सुधीर खिरडकर यांनी केले आहे. त्यांनी सांगितले की, सध्या वाहतूक नियमांनुसार नंबरप्लेटसंदर्भात 500, 1000 आणि 1500 रुपयांपर्यंत दंड आकारला जाऊ शकतो. त्यामुळे मुदतीतच नंबरप्लेट बसवून घेणे हेच शहाणपणाचे आहे.