पर्यावरणपूरक खरेदीसाठी 'वेटिंग'; अकोल्यात १० महिन्यांत २७९७ ई-वाहने रस्त्यावर (Photo Credit - AI)
अकोला: इंधनाची सातत्याने होणारी दरवाढ आणि वाहनांच्या वाढत्या किमतीमुळे गत काही वर्षात इलेक्ट्रीक वाहनांच्या विक्रीत मोठी वाढ झाली आहे. अकोला जिल्ह्यात जानेवारी २०२५ ते ३१ ऑक्टोबर पर्यंत २७९७ ई वाहनांची नोंद करण्यात आली आहे. दिवाळी निमित्ताने दरवर्षी वाहन खरेदी होत असते. यावर्षी केंद्र सरकाराने दुचाकी आणि चारचाकी वाहन प्रकारामधील कमी क्षमतेच्या वाहनांवरील वस्तू आणि सेवा कर कपात करण्याचा निर्णय घेतला होता.
शहरातील जवळपास प्रत्येक वाहन विक्री केंद्रावर जीएसटी कपातीची माहिती दिली जात होती. याचा सकारात्मक परिणाम वाहन विक्रीवरही झालेला दिसतो. गत १० महिन्यात ई-वाहनांची मोठ्या प्रमाणात नोंदणी झाली आहे. शहरातील रस्त्यांवर इलेक्ट्रक वाहनांची संख्या झपाट्याने वाढत आहे. यंदाच्या दिवाळीत वाहन खरेदीसाठी नागरिकांनी इलेट्रिक दुचाकींना अधिक पसंती दिली आहे.
मागील वर्षी २०२३ मध्ये इलेट्रिक दुचाकी वाहनांच्या विक्रीत सुमारे ५ टक्क्यांनी वाढ झाली होती, जी २०२४ मध्ये दुप्पट झाली होती. यावर्षी सुध्दा इलेक्ट्रीक वाहनांच्या विक्रीत वाढ झालेली पाहायला मिळाली. प्रदूषणाची चिंता आणि दररोज वाढणाऱ्या इंधन दरांमुळे इलेक्ट्रक वाहनांची मागणी दरवर्षी वाढत आहे.
Akola News: उरळ पोलिसांचा ‘दणका’! एकाच दिवशी पाच दारू विक्रेत्यांवर धाड; लाखोंचा मुद्देमाल जप्त
सध्या शहरात इलेक्ट्रक वाहनांची संख्या एक लाखापर्यंत पोहोचली आहे. हे वाहन पर्यावरणपूरक असून ध्वनी प्रदूषणही करीत नाहीत. त्यामुळे त्यांना पर्यावरणासाठी अनुकूल मानणे चुकीचे ठरणार नाही. दररोज पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीमुळे अनेकांचे बजेट कोलमडत आहे. पर्यावरणपूरक वाहन असल्याने सवलती: पर्यावरणपूरक वाहनांवर सरकारकडून विविध सवलती दिल्या जात आहेत. वीज तुलनात्मकदृष्ट्या स्वस्त असल्यामुळे इंधनाची बचत होते. भारत सरकारकडून प्रोत्साहन देण्यासाठी अनेक योजना राबविल्या जात आहेत. सबसिडी, माफक व्याजदरावर कर्ज आणि घराच्या गॅरेजमध्ये चार्जिंग स्टेशन बसवण्यासाठी अनुदान यांचा समावेश आहे.
इलेक्ट्रक वाहनांचे इंजिन पारंपरिक वाहनांच्या इंजिनच्या तुलनेत सोपे असते, त्यामुळे देखभालीचा खर्च कमी येतो. भविष्यात किंमती कमी होण्याची शक्यता लक्षात घेता इलेट्रिक वाहनांची मागणी वाढत आहे. मात्र काही अडचणी अजूनही आहेत. चार्जिंग स्टेशनची कमतरता आणि तुलनात्मकदृष्ट्या अधिक किंमती या प्रमुख अडचणी आहेत. मात्र सरकार आणि खाजगी कंपन्या चार्जिंग स्टेशनची संख्या वाढवण्यासाठी प्रयत्नशील आहेत. तसेच तंत्रज्ञानाच्या सुधारणेमुळे इलेक्ट्रिक वाहनांच्या किंमती कमी होण्याची शक्यता आहे.
सध्या बाजारात ५० हजार रुपयांपासून इलेट्रिक दुचाकी वाहनांच्या किंमती सुरू होतात. इलेक्ट्रिक वाहनांची गुणवत्ता आणि बॅटरीच्या क्षमतेनुसार ४ लाख रुपयांपर्यंतच्या इलेक्ट्रिक दुचाकी बाजारात उपलब्ध आहेत. त्यामुळे इलेक्ट्रीक वाहनांवर नागरीकांचा जोर पाहावयास मिळत आहे. आता शहरात हळुहळु इलेक्ट्रीक गाड्यांची संख्या वाढलेली दिसत आहे. काही प्रमुख कंपन्यांच्या गाड्यांना अधिक मागणी आहे. सध्याच्या स्थितीत खरेदीसाठी वेटिंगही पाहायला मिळत आहे.
फसू नका! Second Hand EV खरेदी करताना ‘या’ 5 गोष्टींकडे लक्ष द्या






