फोटो सौजन्य: X
भारतात अनेक कार उत्पादक कंपन्या आहेत, ज्या भारतीय मार्केटमध्ये बेस्ट कार ऑफर करत आहे. याव्यतिरिक्त काही कंपन्या भारतातच आपल्या काही कार उत्पादित करून विदेशात निर्यात करत असतात. याचा फायदा असा होतो की देशात उत्पादित होणाऱ्या कार स्वस्त किमतीत उपलब्ध होतात आणि बाहेर निर्यात केल्यामुळे देशाला आर्थिक बळ सुद्धा मिळते.
मारुती सुझुकी देशात अनेक बजेट फ्रेंडली आणि हाय परफॉर्मन्स कार ऑफर करत आहे. तसेच आपल्या काही कार भारतात मॅन्युफॅक्चर देखील करतात. अशीच एक मेड इन इंडिया कार जपानच्या मार्केटमध्ये धुमाकूळ घालताना दिसत आहे.
मारुती सुझुकी भारतीय बाजारपेठेत तसेच इतर अनेक देशांमध्ये आपली वाहने उपलब्ध करून देते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, कंपनीने ऑफर केलेल्या Jimny ला जपानमध्ये चांगली मागणी मिळत आहे. चला जाणून घेऊया, जपानमध्ये या कारला एकूण किती बुकिंग मिळाली आहे, तसेच तेथे या कारचा Waiting Period किती झाला आहे.
मारुतीने पाच-दरवाज्यांची ऑफ-रोडिंग एसयूव्ही म्हणून सादर केलेली मारुती जिम्नी जपानमध्ये खूप पसंत केली जात आहे. कंपनीच्या या एसयूव्हीला जपानमध्ये भरपूर बुकिंग मिळत आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, कंपनीला जपानमध्ये या कारच्या ५० हजार युनिट्ससाठी बुकिंग मिळाली आहे. विशेष म्हणजे ही कार जपानमध्ये चार दिवसांपूर्वीच लाँच करण्यात आली आहे. मोठ्या संख्येने बुकिंग मिळाल्यामुळे, या एसयूव्हीचे बुकिंग तात्पुरते थांबवण्यात आले आहे.
माहितीनुसार, दरमहा 1200 जिमनीचे युनिट्स जपानला निर्यात केले जात आहे. या परिस्थितीत, मारुती दरवर्षी जपानला फक्त 14400 युनिट्स पाठवेल. अशा परिस्थितीत, 50 हजार बुकिंग मिळाल्यामुळे, या कारची डिलिव्हरी मिळण्यासाठी सुमारे 3.5 वर्षे किंवा 41 महिने लागू शकतात. परंतु, या कारची पहिली शिपमेंट आधीच जपानला पाठवण्यात आली आहे, त्यामुळे त्याच्या काही युनिट्स तेथे डिलिव्हरीसाठी उपलब्ध करून देण्यात आले आहेत.
जिम्नीची निर्मिती मारुतीने त्यांच्या गुरुग्राम येथील प्लांटमध्ये केली आहे. येथून ही कार भारतीय बाजारपेठेत तसेच अनेक देशांमध्ये निर्यात केली जात आहे. भारताव्यतिरिक्त, या कारचे फाइव्ह डोअर व्हर्जन लॅटिन अमेरिका, दक्षिण आफ्रिका, आग्नेय आशिया आणि मध्य पूर्व देशांमध्ये पाठवली जाते. फाइव्ह डोअर व्हर्जन व्यतिरिक्त, या कारचे थ्री डोअर व्हर्जन देखील अनेक देशांमध्ये विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आले आहे.
जपानी बाजारपेठेत, Jimny Nomade ची किंमत 25.51 लाख जपानी येनपासून ते 27.50 लाख जपानी येन आहे, जी भारतीय चलनात अंदाजे 14.88 लाख ते 15.43 लाख रुपये आहे. जपानमध्ये त्याची डिलिव्हरी एप्रिल २०२५ पासून सुरू होईल.