
जर तुम्ही मारुती सुझुकीची नवी कार घेण्याचा विचार करत असाल, तर आता तुम्हाला खिसा जास्त रिकामा करावा लागणार आहे. देशातील सर्वात मोठी वाहन उत्पादक कंपनी मारुती सुझुकी इंडियाने आपल्या विविध मॉडेल्सच्या किमती वाढवण्याची घोषणा केली आहे. येत्या ऑगस्ट २०२६ पासून ही नवी दरवाढ लागू होणार असून, गाड्यांच्या मॉडेलनुसार किमतींमध्ये जास्तीत जास्त ३० हजार रुपयांपर्यंतची वाढ होणार आहे.
दरवाढीमागचे मुख्य कारण काय?
कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, कच्चा माल, उत्पादन आणि इतर इनपुट खर्चात सातत्याने होणारी वाढ यामुळे हा निर्णय घ्यावा लागला आहे. गेल्या काही महिन्यांत अंतर्गत पातळीवर खर्च नियंत्रणात ठेवण्यासाठी अनेक उपाययोजना करण्यात आल्या; मात्र, वाढत्या महागाईचा आणि खर्चाचा हा मोठा भार कंपनीला एकटीला पेलणे कठीण झाल्यामुळे अखेर याचा काही भाग ग्राहकांवर टाकणे भाग पडल्याचे स्पष्टीकरण देण्यात आले आहे.
रेनॉल्ट-निसानचा मोठा धमाका! पुढील वर्षापर्यंत भारतात येणार ४ नवीन SUV! पाहा झलक
२०२६ मधील ही दुसरी दरवाढ
विशेष म्हणजे, चालू वर्षातील मारुती सुझुकीची ही दुसरी दरवाढ आहे. याआधी जून २०२६ मध्येही कंपनीने गाड्यांच्या किमती ३० हजार रुपयांपर्यंत वाढवल्या होत्या. त्यावेळी जागतिक पातळीवरील घडामोडी, भू-राजकीय तणाव आणि कच्च्या मालाचे वाढलेले दर यांमुळे महागाईचा दबाव वाढल्याचे कारण देण्यात आले होते. सध्या कंपनी एंट्री-लेव्हल ‘एस-प्रेसो’पासून ते प्रीमियम ‘इन्व्हिक्टो’ एमपीव्हीपर्यंत अनेक गाड्यांची विक्री करते आणि या निर्णयाचा ग्राहकांवर कमीत कमी परिणाम व्हावा यासाठी प्रयत्नशील असल्याचे कंपनीचे म्हणणे आहे.
Hyundai Boulder: ह्युंदाई ‘बॉल्डर’ ऑफ-रोड एसयूव्हीचे भारतात डिझाइन पेटंट; जाणून घ्या सविस्तरपणे
किमती वाढल्या तरी विक्रीचा आलेख उंचच
दरवाढीचे सत्र सुरू असले तरी मारुती सुझुकीच्या गाड्यांची विक्री भक्कम स्थितीत आहे. जून २०२६ मध्ये कंपनीने एकूण २,००,३९० वाहनांची विक्री केली, ज्यामध्ये १,५०,१५० गाड्या देशांतर्गत बाजारात विकल्या गेल्या तर ४२,७६८ गाड्यांची निर्यात झाली. यापूर्वी मे २०२६ मध्ये कंपनीने तब्बल २,४२,६८८ वाहनांची विक्री करत विक्रमी कामगिरी नोंदवली होती.