फोटो सौजन्य: Social Media
आपली स्वतःची बाईक असावी जिच्यावर आपण कुठेतरी लांब फिरायला जावं असं प्रत्येक तरुणाचं स्वप्न असतं. काही जण तर पैश्याची बचत करून आपली ड्रीम बाईक विकत सुद्धा घेतात. पण जेव्हा ती बाईक चालवायची वेळ येते, तेव्हा एक प्रश्न नक्कीच मनात येतो, खासकरून नवीन बाईकस्वारांच्या. तो प्रश्न म्हणजे बाईकचा गिअर बदलताना क्लच अर्धा दाबायचा असतो की पूर्ण?
बाइकमध्ये वेगवेगळे गिअर्स असतात, जे वेगवेगळ्या स्पीडने काम करत असतात. बाईकच्या स्पीडनुसार रायडर या गिअर्सना अॅडजस्ट करतो. बाईकला पहिल्या गिअरमध्ये आणण्यासाठी किंवा चालत्या बाईकमध्ये गिअर बदलण्यासाठी, रायडरला क्लच दाबावा लागतो. ही एक सामान्य प्रक्रिया आहे. पण, बरेच लोकं गोंधळलेले असतात की क्लच अर्धा दाबायचा की पूर्ण दाबायचा? चला या प्रश्नाचे उत्तर जाणून घेऊया.
हे देखील वाचा: पावसात बाईक चालू नाही होतेय? जाणून घ्या ‘या’ 6 सोप्या उपायांबद्दल
गिअर्स बदलताना क्लच अर्धा दाबावा की पूर्ण दाबावा हे समजून घेण्यासाठी, तुम्ही आधी क्लचचे कार्य काय आहे हे जाणून घेणे महत्वाचे आहे. क्लचचे काम इंजिन आणि गिअरबॉक्समधील ट्रान्समिशन थांबवणे आहे. जेव्हा तुम्ही क्लच दाबता तेव्हा हे कनेक्शन तुटते, ज्यामुळे तुम्ही सहजपणे गीअर्स बदलू शकता.
तुम्ही क्लच अर्धाच दाबल्यास इंजिन आणि गिअरबॉक्समध्ये काही कनेक्शन अजूनही राहते. यामुळे गिअर बदलताना धक्का बसू शकतो आणि गीअरबॉक्स खराब होऊ शकतो.
हे देखील वाचा: कारची सर्व्हिसिंग केल्यानंतर न चुकता तपासा ‘या’ 5 गोष्टी, होईल पैश्याची बचत
जेव्हा तुम्ही क्लच पूर्णपणे दाबता, तेव्हा इंजिन आणि गिअरबॉक्समधील कनेक्शन पूर्णपणे तुटलेले असते, ज्यामुळे तुम्ही सहजपणे बाईकचे गीअर्स बदलू शकता. म्हणूनच तुम्ही बाईकमधील गिअर्स बदलताना तुम्ही नेहमी क्लच पूर्णपणे दाबावा.
बाईकमधील गिअर्स बदलताना क्लच अर्धवट दाबल्याने इंजिन आणि गिअरबॉक्समधील कनेक्शन पूर्णपणे तुटत नाही. ज्यामुळे गिअर्स बदलताना गिअरबॉक्सवर अनावश्यक दबाव पडतो. परिणामी गिअरबॉक्स खराब होऊ शकतो. क्लच अर्ध्यावर दाबल्याने बाईकला धक्का लागू शकतो, ज्यामुळे बाईकच्या इतर भागांचेही नुकसान होऊ शकते. तसेच इंधनाचा वापर सुद्धा वाढू शकतो.
क्लच पूर्णपणे दाबल्याने गिअरबॉक्सवर कमी दाब पडतो, ज्यामुळे त्याचे आयुष्य वाढते. तसेच बाईकचा मायलेजही वाढतो. क्लच पूर्णपणे दाबल्याने बाईक सुरळीत चालते व तिला कोणतेही धक्के बसत नाहीत.