यंदाच्या राष्ट्रकुल स्पर्धांमध्ये भारतीय खेळाडूंची बरीच वाहवा झाली. भारतानं चांगला खेळ करत बरीच गोल्ड मेडल मिळवली. अगदी स्पेसिफिक सांगायचं तर २२ गोल्ड, १६ सिल्व्हर आणि २३ ब्राँझ, अशी एकूण ६१ मेडल्स भारतीयांनी मायदेशी आणली. आता हे एवढे आकडे बघितल्यावर कदाचित हा भारताचा बेस्ट परफॉर्मन्स आहे, असं वाटू शकेल. कारण सोशल मीडियात ज्या पद्धतीनं भारतीय संघाची वाहवा होतेय, त्यावरून त्यांनी न भूतो अशी कामगिरी केली असावी, असं कुणालाही वाटेत. पण थोडं थांबा…
२०१० साली दिल्लीत झालेल्या स्पर्धेमध्ये भारताला ३८ गोल्ड मेडल्स होती. अगदी ४ वर्षांपूर्वी झालेल्या स्पर्धेतही भारताची कामगिरी यापेक्षा चांगली होती. गोल्ड कोस्टमध्ये २६ गोल्ड मेडल्सची कमाई भारतीयांनी केली होती. २००२मध्ये ३० आणि २००६मध्ये यावेळच्या एवढीच, २२ गोल्ड मेडल भारतानं जिंकली होती. त्यामुळे फक्त आकडेवारी गृहित धरली तर भारताची यावेळची कामगिरी ही सर्वसाधारण आहे, असंच म्हणावं लागेल. ही भारताची आजवरची कॉमनवेल्थमधली सर्वात चांगली कामगिरी ठरल्याचं म्हणणं धाडसी ठरेल, हे खरं… मात्र आधीच्या स्पर्धा आणि आताची स्पर्धा यांची केवळ क्वांटीटेटीव्ह तुलना न करता क्वालिटेटीव्ह केली, तर हे कदाचित पटेल.
दिल्लीत झालेल्या स्पर्धांमध्ये भारताची एकूण पदकसंख्या होती १०१. मात्र त्यात ३० मेडल्स शूटिंगमध्ये, ८ आर्चरी, ७ ग्रेको-रोमन रेसलिंग आणि ४ टेनिसमध्ये होती. हे चारही क्रीडा प्रकार यंदाच्या स्पर्धेत नव्हते. म्हणजे दिल्लीसारखी स्थिती असती तर पदकांची संख्या थेट ४९नं कमी झाली असती. म्हणजे १७ गोल्डसह भारताकडे केवळ ५२ मेडल्स असती. शिवाय यंदा मिळवलेली लॉन बॉल गोल्ड (वुमन्स फोर कॅटेगरी) आणि सिल्व्हर, क्रिकेट सिल्व्हर आणि ज्युडोमधील मेडल्सही वजा करावी लागतील. कारण २०१० साली हे खेळही नव्हते. याच न्यायानं २०१८च्या स्पर्धेतील शूटिंगची मेडल्स बाजुला काढली तर तेव्हाचे आकडे होतात १९ गोल्ड मेडलसह एकूण ५० मेडल्स… शिवाय मेडल्समधील डायव्हर्सिटीदेखील यंदा अधिक चांगली राहिलीये.
बर्मिंगहॅमचे खरे हिरो राहिले ते भारतीय रेसलर्स आणि वेटलिफ्टर्स… रेसलिंगमध्ये ६ गोल्ड मेडलसह एकूण १२ पदकं आणि वेटलिफ्टिंगमध्ये ३ गोल्ड मेडलसह एकूण १० पदकांची कमाई भारतीयांनी केली. बॉक्सिंगमध्येही ७ मेडल्स आहेत. थोडक्यात, शक्ती लावायच्या खेळांमध्ये भारतीयांनी चांगली कामगिरी केली आहेच, पण युक्तीच्या खेळांमध्येही आपले खेळाडू मागे राहिलेले नाहीत, हे विशेष.
टेबल टेनिसमध्ये ७, बॅडमिंटनमध्ये ६ ज्युडोमध्ये ३, स्क्वाशमध्ये २ मेडल्सवर भारतीय खेळाडूंनी आपलं नाव कोरलं. याखेरीज लॉन बॉल या (भारतीयांना) अत्यंत नव्या प्रकारातही एका गोल्डसह २ मेडल्स जिंकली. विशेष कौतुक आहे ते भारतीय ॲथलिट्सचं. ॲथलेटिक्सच्या विविध प्रकारांमध्ये ८ मेडल्स जिंकत भारतानं प्रथमच हा क्रीडा प्रकार आत्मसाद करत असल्याचं दाखवून दिलंय.
सांघिक खेळांमध्येही आपला राष्ट्रीय खेळ हॉकीमध्ये २ आणि आपला राष्ट्रीय क्रीडा धर्म असलेल्या क्रिकेटमध्ये (सिल्व्हर का होईना) एक पदक भारतानं जिंकलं. त्यामुळेच एकूणच यावेळी मेडल्सची संख्या थोडी कमी दिसत असली तरी गुणात्मकतेचा विचार करता ही कामगिरी अधिक सरस ठरणारी आहे.
चाळिशी म्हणजे खरंतर कोणत्याही खेळाडूसाठी निवृत्त होण्याचं किंवा किमान निवृत्तीचे विचार मनात येण्याचं वय… पण भारताचा टेबलटेनिस प्लेअर शरथ कमल याला अपवाद ठरलाय. मेन्स सिंगल्समध्ये त्यानं गोल्ड जिंकलंच, पण मेन्स टिम इव्हेंटमध्येही त्यानं आपल्या सहकाऱ्यांसह गोल्ड मेडल पटकावलं. मिक्स डबल्स आणि मेन्स डबल्समध्ये सिल्व्हर मेडलची कमाई शरथनं केली. वयाच्या ४०व्या वर्षी या स्पर्धेत त्यानं ४ पदकं कमावण्याची कामगिरी केलीये. आतापर्यंत खेळलेल्या ५ कॉमनवेल्थ स्पर्धांमध्ये त्याच्या नावावर १३ मेडल्स जमा आहेत.
ऑलिम्पिक गोल्ड मेडल गळ्यात असतानाही आतापर्यंत कॉमनवेल्थचा पेपर पी. व्ही. सिंधूला कठीणच जात होता. २०१४मध्ये ब्राँझ आणि २०१८मध्ये सिल्व्हर मेडलवर तिला समाधान मानावं लागलं होतं. मात्र यावेळी नीट नियोजन करून, अनावश्यक स्पर्धांमध्ये विश्रांती घेऊन, आपला फिटनेस कायम ठेवत सिंधूनं गोल्ड मेडलला गवसणी घातलीच. दुसरीकडे मेन्स सिंगल्समध्ये लक्ष्य सेन यानंही सोनेरी कामगिरी करत तिरंगा फडकवला.
यावर कळस चढवला तो चिराग शेट्टी आणि स्वस्तिकराज रांकीरेड्डी या जोडीनं डबल्समध्ये… या दोघांनी गोल्ड कोस्टमध्ये सिल्व्हर मेडलपर्यंत मजल मारली होती. मात्र आता कॉमनवेल्थमध्ये बॅडमिंटन डबल्स जिंकणारी ही पहिली भारतीय जोडी ठरलीये. या विजयाची खासियत अशी, की शेट्टी-रांकीरेड्डी जोडीमुळेच आपण पदकतालिकेमध्ये न्यूझीलंडला मागे टाकू शकलोय.
बर्मिंगहॅममध्ये भारतानं पुन्हा एकदा चांगली कामगिरी केल्यानंतर आता भारतानं राष्ट्रकुलातून बाहेर पडावं, असा एक सूर सोशल मीडियावर उमटलाय. राष्ट्रकुल म्हणजे एकेकाळी ब्रिटनच्या राणीच्या अधिपत्याखाली असलेले देश. त्यामुळे या गटात राहणं म्हणजे गुलामगिरी मान्य केल्यासारखं आहे, असं कारण यामागे सांगितलं जातं. हे एकाअर्थी खरं असलं तरी परस्पर सहकार्य, क्रीडा स्पर्धा यासाठी राष्ट्रकुल हे निमित्त असेल, तर काय हरकत आहे. जगात या ना त्या कारणानं एकत्र आलेले असे अनेक देशांचे गट आहेतच… भौगोलिक स्थितीमुळे युरोपियन युनियन असेल किंवा आपली सार्क असेल. किंवा मग विकसनशील देशांची संघटना ब्रिक्स असेल…
कॉमनवेल्थ स्पर्धांच्या निमित्तानं जगातल्या पन्नासएक देशांच्या खेळाडूंसोबत स्पर्धा करता येते. त्यात ऑलिम्पिकमध्ये सातत्यानं चांगली कामगिरी करणारे ऑस्ट्रेलिया, कॅनडासारखे देशही असतात, हे विसरून चालणार नाही. त्यामुळे राजकारण बाजुला ठेवून किमान क्रीडा स्पर्धांसाठी तरी भारतानं राष्ट्रकुल गटाचा भाग होऊन राहावं, असं एक क्रीडाप्रेमी म्हणून नक्की वाटतं.
देश |
गोल्ड |
सिव्हर |
ब्राँझ |
एकूण |
ऑस्ट्रेलिया | ६७ | ५७ | ५४ | १७८ |
इंग्लंड | ५७ | ६६ | ५३ | १७६ |
कॅनडा | २६ | ३२ | ३४ | ९२ |
भारत | २२ | १६ | २३ | ६१ |
न्यूझीलंड | २० | १२ | १७ | ४९ |
sportswriterap@gmail.com