
भगवान शंकराच्या बारा द्वादश ज्योतिर्लिंगांपैकी सोमनाथ आणि रामेश्वर समुद्रकिनारी असून महाकालेश्वर, काशिविश्वेश्वर आणि ॐकारमांधाता ही नदीकिनारी आहेत. वैजनाथ, नागनाथ आणि घृष्णेश्वर ही सखल प्रदेशात असून केदारनाथ, मल्लिकार्जुन, त्र्यंबकेश्वर आणि भीमाशंकर ही चार ज्योतिर्लिंगे उंच पर्वतावर आहेत. अशा या द्वादश म्हणजे बारा ज्योतिर्लिंगांपैकी ओंमकारेश्वर हे चवथ्या क्रमांकाचे स्वयंभु ज्योतिर्लिंग असून मध्यप्रदेशातील नेमाड जिल्ह्यात मोरटक्का या गावापासून फक्त दहा बारा किलोमीटर अंतरावर आहे. हे क्षेत्र नर्मदेच्या वाहत्या प्रवाहातील बेटावर आहे. सभोवताली सुंदर परिक्रमेचे क्षेत्र असून नावेत बसल्यावर जलप्रवाहात प्रत्यक्ष भगवान शंकराच्या सानिध्यात असल्याचा भास होतो आणि नर्मदेच्या विशाल पात्राशी आपण कधी एकरूप होतो हे कळतच नाही. तसे भगवान शंकराचे ओमकार स्वरूप सर्वव्यापी आहे. पण काही विशिष्ट ठिकाणी त्यांचा प्रत्यक्ष कायम स्वरूपी निवास असल्याने स्थान महात्म्य वाढत असते. ओंकारेश्वरला जाण्याचा दोन वेळा प्रसंग आला आणि विंध्य पर्वताच्या कुशीत वसलेल्या निसर्गाच्या ओंकारद्विपाच्या सानिध्यात भान हरवून बसलो.
मध्यप्रदेशातल्या खंडवा जिल्हा..! सिनेसृष्टीतील प्रसिद्ध गायक आणि कलाकार बंधू अशोककुमार, किशोरकुमार आणि अनुपकुमार यांची ही जन्मभूमी. या जिल्ह्यातील ओंकारेश्वर म्हणजे एक सर्वांग सुंदर पौराणिक आणि प्राचीन आध्यात्मिक ठिकाण. पुरातन काळात येथे मांधाता नावाचा राजा होऊन गेल्याने आणि मांधाता नावाचा पर्वत असल्याने या स्थानाला ‘मांधाता ओंकारेश्वर’ असेही श्रद्धेने म्हटल्या जाते. अनेक पौराणिक, ऐतिहासिक आणि सत्यकथा येथे घडलेल्या आहेत आणि पिढ्यानपिढ्या त्यांचे श्रवण होत आहे. इंदोरपासून फक्त ८० किलोमीटरवर असलेले तीन तासांच्या अंतरावरचे नर्मदा नदीच्या तीरावर वसलेले ओंकारेश्वर हे प्राचीन ‘शिवपुरी’ नावाचे पवित्र बेट आहे. नर्मदा नदीच्या मध्यभागी ॐ –ओम आकाराच्या एका द्वीपावर हे बेट वसलेले आहे. या बेटावर एक दक्षिणोत्तर दरी असल्याने या बेटाचे दोन भाग झालेले स्पष्ट पणे दिसून येतात. हे संपूर्ण बेट आणि नर्मदा नदीची धार ओम आकाराची असल्याने याला ॐकारद्वीप सुद्धा म्हणतात. या ठिकाणी नर्मदा नदीला ॐ च्या आकाराचा वेढा असून नावेने येथे परिक्रमा केली जाते आणि हा एक अद्भुत अनुभव आहे. दुसरे असे की भगवान शंकर येथे ओंकारेश्वर नावाने अवतीर्ण झालेत आणि शिवलिंगाचा आकार हा ओमचा असल्याने या स्थानाला ओंकारेश्वर म्हटल्या जाते. येथे बेटाच्या वरच्या भागात कावेरी नदी ही नर्मदेला येऊन मिळते आणि या संगमावर नदीला नारळ अर्पण केल्या जातो. लोकमाता नर्मदा नदी येथे पश्चिमवाहिनी होउन विंध्य पर्वताच्या परिसरातल्या मध्यप्रदेशातून आणि जंगल डोंगरदर्यातून खळखळत वाहते. या परिसरात नर्मदेला ‘रेवा’ नदी सुद्धा म्हणतात. या नदीचे वैशिष्ट्य असे की प्रवाहाच्या शुभ्र पात्रात येथे गुळगुळीत असलेले दगड सापडतात. या दगडांना भगवान शंकराचा अंश मानल्या जाते म्हणून यांना ‘बाणलिंग’ सुद्धा म्हणतात. या मुळेच नर्मदेला ‘शांकरी नदी’ही म्हणतात. नर्मदेच्या अलीकडे ओंकारेश्वर असून पलीकडे अमरेश्वर आहे. भगवान शंकराने येथे भक्तांच्या संरक्षणाकरिता कायम निवास केला असल्याने ते अमर झाले आणि अमरेश्वर हे नाव पडले. पुढे याचे ममलेश्वर झाले. हे स्थान रुद्रपुरीला आहे.
या सुंदर विलोभनीय स्थानावर ब्रम्हा, विष्णू, महेश या देवांनी वास्तव्य केले असल्याने हे बेट ‘शिवपुरी’ नावानेही ओळखले जाते. यांच्या वास्तव्यामुळे हे क्षेत्र ब्रम्हपुरी, विष्णुपुरी आणि रुद्रपुरी असे त्रिपूर क्षेत्र मानले जाते. त्यामुळेच अगस्ति मुनींसह अनेक ऋषी- मुनी येथे आश्रम स्थापन करून तपश्चर्या करत असत. विंध्यपर्वताने सुद्धा शिवाची आराधना करून त्यांना प्रसन्न करून घेतले आणि हा पर्वत मोहक झाला. या पर्वतावर विंध्यवासिनीचे स्वयंभू देवालय आहे. नर्मदा नदी पार करून आणि नदीत स्नान करून भक्तिनामाचा गजर करीत काहीशा उंच असलेल्या मंदिरात भाविक भारावलेल्या यात्रेसारखे चालत असतात. हातात पुजेचे साहित्य, हार, फुलमाळा यांनी हा संपूर्ण परिसर पहाटेपासूनच सजून पवित्र झालेला दिसतो. पहाटेच्या विशाल नर्मदेच्या दृश्याला खरोखरच तोड नाही. पहाटेच्या सोनेरी किरणात न्हाऊन निघालेल्या नर्मदेचे अद्भुत दर्शन या बेटावरून होते. या सौंदर्याला कुठलीही तोड नाही, कुठलीही उपमा नाही. या मंदिराची रचना नर्मदेच्या पाण्याशी संलग्नीत आहे. हे मंदिर अतिशय भव्य आणि उत्तुंग आहे. अद्भुत मन:शांती येथे लाभते. अतिशय विशाल आणि प्रशस्त प्रांगण आहे. गाभार्यामध्ये स्वयंभू शिवलिंग खोलगट शाळूंकेत आहे. ओमकार लिंगाच्या जललहरीमधून नर्मदा नदीचे पाणी एकाच पातळीवर नेहमी वाहत असते. या पाण्यावर अनेकदा बुडबुडे उठतात. हे भगवान शंकराच्या संतोषाचे द्योतक आहे असे मानल्या जाते. येथे ओंकारेश्वराचे त्रिकाल पूजन होते. सकाळी स्थानिक राजेसाहेबांतर्फे भस्मपूजा होते. ग्वाल्हेरच्या महाराजांतर्फे मध्यान्हपूजा, महानैवेद्य होतो आणि इंदूरच्या होळकरांतर्फे रात्रीची शयनातीपूजा होते. याच परिसरात अन्नछत्र, नौबतखाना आणि घड्याळघरही बघायला मिळते. वैशाखमास, श्रावणमास, कार्तिकी पौर्णिमा आणि महाशिवरात्री अशी चारवेळा यात्रा भरते. महाशिवरात्रीला येथे अलोट जनसागर ऊसळतो. मांधाताच्या दक्षिणतीरावर अमलेश्वरचे प्रख्यात मंदिर आहे. याचे फार मोठे धार्मिक महात्म्य आहे. यालाच ममलेश्वरसुद्धा म्हणतात. म्हणूनच ॐकार स्थानाला एकत्रित पाने ओंकारमम्लेश्वरम असेही म्हटले जाते. या मंदिराच्या भिंतीवर इ.स.१०६३ मध्ये परमारराजा उदयादित्य याने चार संस्कृत श्लोक कोरून घेतले. त्यात शिवमहिम्न स्तोत्रसुद्धा आहे. येथे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी ‘कोटीलिंगार्चनाची’ पद्धत सुरू केली. ही पूजा वर्षभर सुरू असते. या करिता अहिल्याबाईंनी नर्मदेवर घाट बांधले. पूजेनंतर लाकडी फलकातील ही तेराशे पार्थिव शिवलिंगे नर्मदानदीच्या प्रवाहात विसर्जित केल्या जातात. अठराव्या शतकात दुसरे बाजीराव पेशवे यांनी येतील अनेक जुन्या मंदिराचा जीर्णोद्धार केला होता.
इक्वाशु कुळातील राजा मांधाता हे वैदिक काळात सुर्यकुळातील अयोध्येचे राजे होते. सम्राट मांधाताच्या बाराव्या पिढीनंतर राजा हरिश्चंद्र हे अयोध्येचे राजा बनले. रामायणातील दशरथपुत्र प्रभुरामचंद्र हे इक्वाशु वंशातील पासष्टाव्या पिढीत झाले. मांधाता हा महापराक्रमी राजा व दाता होता. शंभर राजसूय आणि अश्वमेध यज्ञ करणारे राजा मांधाता हे धर्मात्मा सम्राट चक्रवर्ती होते. वडिलांचे नाव युवानाश्व आणि आईचे नाव गौरी होते. अनेक पत्नी असूनही त्यांना अपत्य नसल्याने त्यांनी आपल्या प्रधानावर राज्य कारभार सोपवून ते जंगलात भार्गव ऋषींच्या आश्रमात राहु लागले. पण एका रात्री त्यांना तहान लागण्याने त्यांनी चुकून कलशातले मंतरलेले पुत्रप्राप्ती करणारे पाणी प्याले आणि युवानाश्व यांच्या पोटी राजा मांधाताचा जन्म झाला. या पुत्राचे इंद्राने उपजीवन केले आणि या शिवभक्ताचे नाव ‘मांधाता’ ठेवण्यात आले. त्यामुळे या क्षेत्राला मांधाता असेही म्हणतात. उंच चौथर्यावर असलेले आणि जुन्या वास्तुशिल्पाचा उत्कृष्ट नमुना असणारे सिद्धनाथाचे मंदिर हे बघण्यासारखे आहे. खांबावरची नक्षीकला मनाला भुरळ घालते. अनेक विदेशी पर्यटक हे मंदिर बघण्याकरिता येतात. पण आज हे मंदिर आज काहीशा भग्नावस्थेत आहे. एका काळात या मंदिराच्या शिखरावरून राणी रूपमतीच्या मांडवगड म्हणजे मांडूचे दिवे दिसत असत.
१९०५ मध्ये हे मंदिर बघण्याकरिता भारताचे व्हॉइसरॉय लॉर्ड कर्झन आले होते. ओंकारेश्वरच्या ज्योतिर्लिंगालाही त्यांनी भेट दिली. हा संपूर्ण सृष्टीसौंदर्याने नटलेला मोहक परिसर बघून व प्राचीन आध्यात्मिक, धार्मिक वैभव बघून ते भारावुन गेले होते. येथे ‘रावणनाला’ नावाच्या प्रवाहाच्या काठावर एक २० फूट लांबीची प्रचंड मोठी मूर्ती असून लोकं तिला रावणाची मूर्ती समजतात. पण प्रत्यक्षात ती चामुंडा देवीची मूर्ती आहे. येथे कावेरी आणि नर्मदा या दोन नद्यांचा संगम असूनही दोन नद्यांचे पाणी एकमेकात मिसळत नाही अशी भाविकांची श्रद्धा आहे.असे हे अनेक पुरातन अवशेषांनी गजबजलेले, लोकमाता नर्मदा नदीच्या निर्मळ आणि गंभीर प्रवाहाने वेढलेले, अप्रतिम निसर्ग सौंदर्याने नटलेले पुराणप्रसिद्ध प्राचीन शिवपुरी म्हणजेच आजचे राजा मांधाताचे ॐकारेश्वर…!
श्रीकांत पवनीकर
sppshrikant81@gmail.com