
कर्नाटक-महाराष्ट्र सीमेलगत चंदगड, आजरा आणि गडहिंग्लज तालुके आहेत. यातील चंदगड आणि आजरा तालुक्यात दरवर्षी पावसाचे प्रमाण अधिक असते. सदाहरित वृक्षांचे हे तालुके. त्यामुळे वातावरणात गारव्याला तोटा नसतो. काही पर्यटकांनी प्रतिमहाबळेश्वर अशी उपाधी जोडली आहे. निसर्गाची अशी अमाप साथ असताना भक्तीची गंगाही येथून दुथडी भरून वाहते.
चंदगड तालुक्यातील देव रवळनाथ, इब्राहिमपूरमधील महादेव मंदिर, सातेरी देवी, भावेश्वरी देवी, दत्तमंदिर आणि रवळनाथ मंदिरांत सायंकाळी भजनांमधून शिवाची आळवणी सुरू होते. काही मंदिरांत रात्री उशिरापर्यंत भक्त भजनात दंगून जातात.
वारकरी संप्रदायाचा मोठा पगडा या दोन्ही तालुक्यांवर आहे. श्रावण महिन्यात वारकऱ्यांसह इतर मंडळीही मांसाहार वर्ज्य करतात.
चंदगड आणि आजरा तालुक्यातील अनेक भजनी मंडळे शास्त्रीय गायकीच्या अंगाने तयारी सुरू करतात. रागदारी भजनावर काही गावांमध्ये भर दिला जातो. आज ज्यांनी वयाची साठी, सत्तरी गाठली आहे, त्यांनी अभंगांच्या वेगळ्या चाली आणि त्याची गायन परंपरा कायम ठेवली आहे. यात काही गावांत ठायीचे अभंग गायन केले जाते. त्यांच्या वैशिष्ट्यांसह गायन हे आजरा आणि चंदगड तालुक्यातील अनेक गायकांचे आकर्षण राहिले आहे.
श्रावण महिन्यात हरिपाठ कीर्ती, हरीविजय, रामायण आणि महाभारतासह पांडव प्रताप, गाथा भजन, दासबोधाचे वाचन मंदिरात केले जाते. हरीपाठ कीर्ती गायनाची वारकरी, भजनी मंडळे तयारी करतात. यात महिला भजनी मंडळांचाही सहभाग असतो. अनेक गावांत संपूर्ण श्रावण महिन्यात भजन, कीर्तन आणि ग्रंथवाचन केले जाते. तर काही गावांत सोमवार आणि शनिवारी भजने होतात.
हनुमान मंदिरातील दिव्यात तेलवात केली जाते. यात मुले-मुली, तरुण-तरुणींचा सहभाग असतो. चार शनिवारी मारुतीरायाच्या गळ्यात रुईच्या फुलांच्या माळा आणि वडे बांधले जातात. भक्तीचा हाच नेम सोमवारी महादेव मंदिरात असतो. महादेवाच्या पिंडीला बेल-फुले वाहण्यात येतात. चार सोमवारी उपवास केला जातो. श्रावण महिन्यातील शेवटच्या सोमवारी पाहुण्यांच्या घरी नातेवाईकांसमवेत राहून उपवास सोडला जातो. काहीजण महादेव मंदिर अन्य देवालयात जाऊन उपवास सोडतात.
अडकूर गावातील रवलनाथ मंदिर अर्थात महादेव मंदिराचे मोठे स्थान आहे. लिंगायत समाजाची या मंदिरातील कठोर उपासना हे या गावचे एक वैशिष्ट. इब्राहिमपूरमधील महादेव मंदिरासह जैन मंदिराचाही यात समावेश आहे. देवरवाडीतील वैद्यनाथ मंदिराशेजारील मोठ्या विहिरीचे पाणी हे गंगोदक म्हणून प्राशन केले जाते आणि उपवास सोडला जातो.
देवरवाडीच्या वैद्यनाथाच्या शेजारी वाघाची गुहा आहे. महिपालगडावरील निसर्ग अनेकांना भक्तिरसात बुडवून टाकतो. त्याचे सगुण रूप म्हणजे कर्नाटक राज्यातून हजारो भाविक वैद्यनाथाच्या दर्शनासाठी येतात. महाराष्ट्र-कर्नाटकाचा सीमावाद देशातील एक चर्चेचा मुद्दा असला तरी भक्तीच्या गंगेत दोन्ही राज्यांतील आपपरभाव लयास जातो.
अडकूरजवळील असलेल्या विंझणे गावातील महादेव मंदिर, भाभीची गुहा, अर्जुनवाडी-मलगेवाडीजवळील महादेव मंदिर, कोदाळीतील माऊली मंदिर, कानडेवाडीनजीकचे पांडवकालीन महादेव मंदिर, हिरण्यकेशी नदी तीरावरील रामतीर्थ आणि महादेव मंदिर, चितळे, भावेवाडीतील खेतोबाची राई येथे भाविक दर्शनासाठी येतात.
विजयकमार कांबळे
vijaykumarkamble239@gmail.com