नवी दिल्ली : अदानी समूहाने होल्सिम या स्विस कंपनीच्या भारतातील व्यवसायाचे अधिग्रहण केले आहे. त्यानंतर त्या कंपनीची भागभांडवली मालकी असलेल्या अंबुजा सिमेंट आणि एसीसी लिमिटेडच्या भागधारकांकडून खुल्या बाजारातून सुमारे ३१ हजार कोटींचे समभाग खरेदी प्रस्तावित केली आहे. दोन्ही कंपन्यांच्या विद्यमान भागधारकांकडून समभाग खरेदीची ही शुक्रवारपासून खुली झालेली ‘ओपन ऑफर’ ९ सप्टेंबरपर्यंत सुरू राहणार आहे.
अदानी समूहाने होल्सिमची भागभांडवली मालकी असलेल्या दोन्ही कंपन्यांत प्रत्येकी २६ टक्के हिस्सेदारी वाढविण्यासाठी ही ‘ओपन ऑफर’ दिली आहे. त्यानुसार खुल्या बाजारातून अंबुजा सिमेंटचे समभाग प्रत्येकी ३८५ रुपयांना, तर एसीसी लिमिटेडचे समभाग प्रत्येकी २,३०० रुपयांना खरेदी केले जाणार असून, ही एकंदरीत ३१ हजार कोटी रुपये खर्चाची योजना आहे.
१९,८७९.५७ कोटी रुपये अंबुजा सिमेंटच्या ५१.६३ कोटी समभागांच्या खरेदीसाठी, तर एसीसी लिमिटेडचे ४.८९ कोटी समभाग एकूण ११,२५९.९७ कोटी रुपयांना खरेदी करण्यात येतील. खुल्या बाजारातून समभाग खरेदीनंतर अदानी समूहाची अंबुजा सिमेंटमध्ये ८९ टक्के आणि एसीसी लिमिटेडमधील हिस्सेदारी ८१ टक्क्यांवर पोहोचणार आहे. मुंबई शेअर बाजारात अंबुजा सिमेंटचा समभाग ५.६० रुपयांनी वधारून ४०२.७० रुपयांवर, तर एसीसीचा समभाग २,२८७.५५ रुपयांवर म्हणजेच ‘ओपन ऑफर’साठी ठरविलेल्या किमतीच्या आसपास पातळीवर शुक्रवारी बंद झाले होते.
बंदरांपासून ऊर्जा क्षेत्रापर्यंतच्या विविध क्षेत्रांत जम वाढवत नेणाऱ्या अदानी समूहाचा या अधिग्रहणानंतर सिमेंट व्यवसायात प्रवेश झाला आहे. होल्सिमचा भारतातील व्यवसाय मिळविण्यासाठी अदानी समूहाने चालू वर्षांत मे महिन्यात ८१ हजार कोटी रुपयांचा करार केला होता.