
किर्लोस्कर समूहाकडून अभियंते अन् अभियांत्रिकीचे महत्व सांगणाऱ्या फिल्मची निर्मिती; काय असणार फिल्ममध्ये?
या चित्रपटातून जगभरातील अभियंत्यांचा गौरव करण्यात आला आहे. शतकानुशतके अभियांत्रिकीने केलेल्या विलक्षण कामगिरीचे दर्शन यात घडते आणि जागतिक विकासक्रमात अभियांत्रिकीची असलेली महत्वाची भूमिका अधोरेखित होते. या चित्रपटाचा मुख्य संदेश सरळ, स्पष्ट आणि ठळक आहे. अभियांत्रिकी अत्यंत महत्त्वाची आहे. राष्ट्रनिर्मितीची ती प्रेरक शक्ती आहे, प्रगतीची गती ती वाढवते आणि आपण बांधू इच्छितो त्या भविष्यातील जगाची भक्कम पायाभरणी ती करते.
चित्रपटाच्या प्रदर्शनासंबंधी बोलताना किर्लोस्कर ऑइल इंजिन्स लिमिटेड आणि किर्लोस्कर इंडस्ट्रीज लिमिटेडचे अध्यक्ष अतुल किर्लोस्कर म्हणाले, “विचार हे प्रत्यक्ष निर्मितीत उतरतात, तेव्हाच त्या विचारांना अर्थ प्राप्त होतो, यावर आमच्या संस्थापकांचा ठाम विश्वास होता. याच विचारधारेने आमच्या यंत्रांची, आमच्या कल्पनांची आणि आमच्या वाढीची दिशा ठरवली. अभियंते हे या प्रवासाच्या मध्यवर्ती ठिकाणी आहेत; ते कल्पनेचे रूपांतर वास्तवात करतात. ‘मेड इन किर्लोस्कर’ ही भावना आम्ही अभिमानाने पुढे नेत आहोत. उज्ज्वल भविष्य उभारण्याच्या आमच्या बांधिलकीला तीच ऊर्जा देत राहणार आहे.”
किर्लोस्कर न्यूमॅटिक कंपनी लिमिटेड आणि किर्लोस्कर फेरस इंडस्ट्रीज लिमिटेड या कंपन्यांचे अध्यक्ष राहुल किर्लोस्कर यांनीही याप्रसंगी आपल्या भावना व्यक्त केल्या. ते म्हणाले, “किर्लोस्करमध्ये आम्ही नेहमीच स्वदेशी नवकल्पनांना प्राधान्य दिले आहे. देशाची गती वाढवणारी उच्च दर्जाची उत्पादने तयार करण्यावर आमचा भर राहिला आहे. उत्पादन हे आमच्या उद्योगाच्या केंद्रस्थानी असते आणि अभियंता हा आमच्या यशाचा मुख्य आधार असतो. आज दर वीस सेकंदाला किर्लोस्करचे एक उत्पादन विकले जाते. शेतकऱ्यांना, उद्योगांना, शहरांना आणि जगभरातील समुदायांना त्यांतून आम्ही साथ देतो. आताच्या या चित्रपटातून आम्ही प्रत्येक अभियंत्याला सॅल्यूट करीत आहोत. या अभियंत्यांनी, निर्मात्यांनी केवळ आमच्या कंपन्याच उभारल्या नाहीत, तर राष्ट्रनिर्मितीलाही बळ दिले आहे.”