
Amul Milk Price Hike : दुधाच्या दरात पुन्हा वाढ! अमूल गोल्ड 4 रुपयांनी, तर ताजा 2 रुपयांनी महागणार
सर्वसामान्य ग्राहकांच्या खिशाला पुन्हा एकदा महागाईचा फटका बसणार आहे. देशातील प्रमुख दुग्ध उत्पादक कंपनी अमूलने ताज्या दुधाच्या दरात वाढ (Amul Milk Price Hike) करण्याचा निर्णय घेतला आहे. गुजरात को-ऑपरेटिव्ह मिल्क मार्केटिंग फेडरेशनने (जीसीएमएमएफ) जाहीर केलेल्या नव्या दरांनुसार, 12 नोव्हेंबर 2026 पासून अमूलच्या प्रमुख दूध उत्पादनांच्या किमतीत सुमारे 4 ते 5.5 टक्क्यांपर्यंत वाढ होणार आहे. त्यामुळे रोजच्या दूध खरेदीसाठी ग्राहकांना अधिक पैसे मोजावे लागणार आहेत.
अमूलच्या सर्वाधिक विक्री होणाऱ्या उत्पादनांपैकी एक असलेल्या अमूल ताजा टोन्ड दुधाच्या (3 टक्के फॅट) दरात प्रतिलिटर 2 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. ही वाढ सुमारे 3.3 टक्के आहे. तर अमूल गोल्ड (6 टक्के फॅट) दुधाच्या किमतीत प्रतिलिटर 4 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. ही वाढ सुमारे 5.5 टक्के आहे. हे नवे दर 12 नोव्हेंबरपासून लागू होतील.
दूध उत्पादन आणि त्यावर प्रक्रिया करण्यासाठी लागणाऱ्या खर्चात सातत्याने वाढ होत असल्याने दरवाढीचा निर्णय घेतल्याचे अमूलकडून स्पष्ट करण्यात आले आहे. गेल्या वर्षभरात हिरवा आणि सुका चारा, पशुखाद्य, तेलबिया पेंड, मका, मळी, दूध पॅकेजिंगसाठी लागणारे साहित्य तसेच इंधनाच्या किमतीत लक्षणीय वाढ झाली आहे. या वाढत्या खर्चाचा परिणाम दूध उत्पादनाच्या एकूण खर्चावर झाला आहे.
याशिवाय गुजरातसह देशातील अनेक भागांत कमी आणि अनियमित पावसामुळे दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. चारा आणि पशुखाद्याच्या उपलब्धतेवरही त्याचा परिणाम झाला आहे. त्यामुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळावा आणि त्यांच्या उत्पन्नाला आधार मिळावा, यासाठी ग्राहकांच्या विक्री किमतीत बदल करणे आवश्यक झाल्याचे कंपनीने म्हटले आहे.
अमूलच्या माहितीनुसार, गेल्या वर्षभरात अमूलशी संलग्न असलेल्या दुग्ध संघांनी शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या दूध खरेदी दरात 4 ते 5 टक्क्यांनी वाढ केली आहे. आता ग्राहकांसाठी करण्यात आलेल्या दरवाढीमुळे दूध उत्पादकांना आणखी चांगला मोबदला देणे शक्य होणार आहे.
अमूलच्या सहकारी व्यवस्थेनुसार, ग्राहकांकडून मिळणाऱ्या एकूण महसुलापैकी सुमारे 80 टक्के हिस्सा देशातील 36 लाख दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांना दिला जातो. त्यामुळे दूध विक्रीच्या किमतीत झालेल्या वाढीचा मोठा भाग थेट शेतकऱ्यांपर्यंत पोहोचणार असल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे. या निर्णयामुळे शेतकऱ्यांना अधिक दूध उत्पादनासाठी प्रोत्साहन मिळेल, असा विश्वासही अमूलने व्यक्त केला आहे.
Ans: अमूलच्या दुधाचे नवे दर 12 नोव्हेंबर 2026 पासून लागू होणार आहेत.
Ans: अमूल ताजा टोन्ड दुधाच्या दरात प्रतिलिटर 2 रुपयांची वाढ करण्यात आली आहे.
Ans: अमूल गोल्ड दुधाच्या दरात प्रतिलिटर 4 रुपयांची वाढ करण्यात आली आहे.