
Amravati News: भाववाढीच्या प्रतीक्षेत कापूस घरातच! सोयाबीनची आवकही घटली; ४ दिवसांत दरात झाली घसरण
Amravati News: यंदा पावसाने ओढ दिल्याने अमरावती विभागातील कापूस आणि सोयाबीन या दोन्ही प्रमुख पिकांच्या उत्पादनाला मोठा फटका बसला आहे. सरासरीच्या तुलनेत तब्बल ४० टक्के कमी पाऊस झाल्याने उत्पादन घटले असतानाच शेतकऱ्यांना आता बाजारभावाच्या चढ-उताराचा सामना करावा लागत आहे. कापसाला सध्या हमीभावापेक्षा अधिक दर मिळत असल्याने शेतकऱ्यांच्या अपेक्षा उंचावल्या आहेत. दिवाळीनंतर कापसाचे भाव आणखी वाढतील, या आशेने अनेक शेतकऱ्यांनी विक्रीची घाई न करता घरातच कापूस साठवून ठेवला आहे. परिणामी बाजारातील कापसाची आवक घटली आहे. दुसरीकडे, सोयाबीनच्या दरातही सातत्याने चढ-उतार सुरू असून, अवघ्या चार दिवसांत भाव घसरल्याने शेतकऱ्यांमध्ये निराशा पसरली आहे.(फोटो सौजन्य – istock)
सध्या बाजारात कापसाला प्रतिक्विंटल ९ हजार ते ९ हजार १०० रुपयांपर्यंत दर मिळत आहे. केंद्र सरकारने कापसासाठी ८ हजार ६०० रुपये प्रतिक्विंटल हमीभाव जाहीर केला आहे. हंगामाच्या सुरुवातीला कापसाला ९ हजार ५०० रुपर्यापर्यंत भाव मिळाला होता. त्यामुळे दिवाळीनंतर बाजारात आणखी तेजी येईल, अशी शेतकऱ्यांना अपेक्षा आहे. याच अपेक्षेने अनेकांनी कापूस विकण्याऐवजी घरातच साठवून ठेवण्यास प्राधान्य दिले आहे. स्थानिक कापूस व्यापारी दीपक मंत्री यांच्या मते, दिवाळीनंतर कापसाच्या दरात वाढ होण्याची शक्यता असल्याने शेतकरी सध्या विक्रीसाठी फारसे उत्सुक नाहीत. परिणामी बाजारातील आवक कमी झाली आहे. मात्र, सुरुवातीला प्रतिक्विंटल ५ हजार रुपये असलेले सरकीचे दर गेल्या काही दिवसांत जवळपास ५०० रुपयांनी घसरले आहेत. सरकीच्या दरातील या घसरणीचा परिणाम कापसाच्या बाजारभावावरही होत आहे. त्यामुळे आगामी काळात कापसाचे दर कोणती दिशा घेतात, याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.
कापसाच्या बाजारात तेजीची अपेक्षा असताना सोयाबीनच्या बाजारात मात्र अनिश्चिततेचे वातावरण आहे. अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीत नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात सोयाबीनच्या दरात दररोज चढ-उतार पाहायला मिळाले. ३१ ऑक्टोबर रोजी सोयाबीनला प्रतिक्विंटल ६ हजार ८०० ते ७ हजार १०० रुपये दर मिळाला होता. या चांगल्या भावामुळे त्या दिवशी बाजारात तब्बल ५ हजार ३८६ क्विंटल आवक झाली होती. मात्र, त्यानंतर बाजारभावात घसरण सुरू झाली. २ नोव्हेंबरला ६ हजार ६५० ते ७ हजार ३१ रुपये, ३ नोव्हेंबरला ६ हजार ७०० ते ६ हजार ९५३ रुपये, तर बुधवारी ६ हजार ६५० ते ६ हजार ८५० रुपये दर नोंदविण्यात आले. गुरुवारी दरात काहीशी सुधारणा होऊन ६ हजार ६५० ते ६ हजार ९५० रुपये भाव मिळाला. मात्र, या दिवशी बाजारातील आवक घटून केवळ २ हजार ५४७ क्विंटलवर आली.
बाजारातील दरातील अनिश्चिततेमुळे शेतकरी माल विक्रीसाठी आणताना सावध भूमिका घेत आहेत. अपेक्षित भाव न मिळाल्यास वाहतूक खर्चही निघणार नाही, अशी भीती शेतकऱ्यांना आहे. त्यामुळे चांगला भाव मिळण्याच्या प्रतीक्षेत अनेकांनी सोयाबीनची विक्रीही मर्यादित ठेवली आहे. एकीकडे कापूस उत्पादक दरवाढीच्या आशेने माल घरात ठेवत आहेत, तर दुसरीकडे सोयाबीन उत्पादक बाजारातील घसरणीमुळे विक्रीबाबत संभ्रमात आहेत. अशा परिस्थितीत दिवाळीनंतर कापूस आणि सोयाबीनच्या बाजारभावात काय बदल होतो, याकडे संपूर्ण शेतकरी वर्गाचे लक्ष लागले आहे.