शेतकरी सन्मान निधी योजनेचे 2000 रुपये मिळाले नाही? ...इथे करा तक्रार!
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरातील शेतकऱ्यांना नुकताच १८ जून रोजी पीएम किसान शेतकरी सन्मान निधी योजनेचा १७ वा हप्ता जारी केला आहे. वाराणसी येथून पंतप्रधान मोदी यांनी एक बटन दाबून देशभरातील योजनेसाठी पात्र 9.6 कोटी शेतकऱ्यांना २००० रुपयांचा हप्ता वितरित केला आहे. मात्र, काही शेतकऱ्यांना ही आर्थिक मदत प्राप्त झालेली नाही. त्यामुळे आता तुम्हालाही शेतकरी सन्मान निधी योजनेची २००० रुपयांची आर्थिक मदत मिळाली नसेल तर शेतकऱ्यांनी कुठे तक्रार करावी? किंवा कुठे संपर्क साधावा. याबाबत सविस्तर जाणून घेणार आहोत.
काय आहे ही योजना?
पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेअंतर्गत दरवर्षी शेतकऱ्यांना सहा हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. प्रत्येक चार महिन्याला तीन टप्प्यात शेतकऱ्यांच्या खात्यावर 2000 हजार रुपयांचा हप्ता जमा केला जातो. आत्तापर्यंत देशातील शेतकऱ्यांना ‘पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेचे १७ हफ्ते मिळाले आहेत. १७ व्या हप्त्यासाठी केंद्र सरकारने देशभरातील शेतकऱ्यांना 20 हजार कोटी रुपयांचे वाटप केले आहे. 9 कोटीहुन अधिक शेतकऱ्यांनी १७ व्या हप्त्याचा फायदा होणार आहे.
कुठे कराल तक्रार?
राज्य तसेच देशातील ज्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर अद्याप 2000 रुपये आलेले नसतील. ते शेतकरी याबाबत थेट तक्रार करता करू शकतात. या योजनेचे काम पाहणाऱ्या pmkisan-ict@gov.in. आणि pmkisan-funds@gov.in या अधिकृत मेल आयडींवर शेतकरी यासंबंधी तक्रार करू शकतात. तसेच पीएम शेतकरी सन्मान निधी योजनेतर्फे एक हेल्पलाईन नंबरही जारी केलेला आहे.
तक्रारीसाठी हेल्पलाईन क्रमांक
शेतकरी 011-24300606, 155261 या हेल्पलाईन नंबरवरही थेट तक्रार करू शकतात. याशिवाय पीएम शेतकरी सन्मान निधी योजनेअंतर्गत एक टोल फ्री नंबरही जारी करण्यात आला आहे. 1800-115-526 टोल फ्री नंबरवरही शेतकरी आपली तक्रार दाखल करू शकतात.
दरम्यान, राज्यासह देशभरात सध्या खरिपाच्या पेरणीसाठी शेतकऱ्यांची लगबग सुरु आहे. अनेक शेतकऱ्यांना बियाणे, खते खरेदी करण्यासाठी आर्थिक भांडवलाची आवश्यकता आहे. अशातच आता पीएम शेतकरी सन्मान निधी योजनेच्या १७ व्या हप्ताचा निधी अनेक शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांकडून समाधान व्यक्त केले जात आहे. देशातील योजनेसाठी पात्र प्रत्येक लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर 2000 रुपये याप्रमाणे केंद्र सरकारने मंगळवारी (ता.१८) 9.6 कोटी शेतकऱ्यांना एकूण 20 हजार कोटी रुपये वितरित केले आहे.