
Trump Tariff Impact on India: रशियन तेलावरून भारताला ५००% टॅरिफची धमकी! ट्रम्पच्या धमकीने शेअर बाजारात घसरण
Trump Tariff Impact on India: रशियाकडून तेल खरेदीमुळे भारतावर ५०० टक्के टॅरिफ लादण्याची धमकी अमेरिका राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump)यांनी दिली आहे. अशा देशांवर कठोर निर्बंध लादण्याच्या प्रस्तावित विधेयकाला ट्रम्प यांनी पाठिंबा दिला आहे. रिपब्लिकन सिनेटर लिंडसे ग्रॅहम यांनी ही माहिती दिली. हे विधेयक मंजूर झाल्यास भारतासह चीन, ब्राझीलसारख्या देशांवर रशियन तेल किंवा युरेनियम खरेदी केल्याबद्दल ५००% पर्यंत आयातशुल्क (टॅरिफ) लावण्याचा अधिकार ट्रम्प यांना मिळणार आहे. पुढील आठवड्यात सिनेटमध्ये विधेयकावर मतदान होण्याची शक्यता आहे. असे झाल्यास याचा थेट परिणाम भारतावर होऊन वॉशिंग्टनसोबतचे व्यापारसंबंध ताणले जाण्याची शक्यता आहे.
ग्रॅहम यांनी सांगितले की, बुधवारी व्हाईट हाऊसमध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या भेटीत या द्विपक्षीय रशिया निबंध विधेयकाला त्यांनी ‘ग्रीन सिग्नल’ दिला. व्हाईट हाऊसच्या एका अधिकाऱ्यानेही त्यास दुजोरा दिला आहे. रशियाच्या युक्रेनवरील आक्रमणाला आर्थिक फटका देणे आणि युद्धाला निधीपुरवठा थांबवणे, हा या विधेयकाचा उद्देश असल्याचे सांगण्यात येते. या विधेयकात भारत, चीन आणि ब्राझीलसारख्या देशांचा विशेषतः उल्लेख आहे. याद्वारे स्वस्त रशियन तेल खरेदी करणाऱ्या देशांना शिक्षा दिली जाणार आहे. ग्रॅहम यांच्या मते, युक्रेन शांततेसाठी काही सवलती देत आहे; मात्र रशियाचे अध्यक्ष केवळ बोलत आहेत आणि निरपराधांचे जीव जात आहेत.
रशिया निर्बंध विधेयक काय?
अमेरिकी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ५००% टॅरिफ (Trump tariffs) लादण्याची धमकी दिल्यानंतर भारतीय शेअर बाजारात मोठी घसरण झाली. आयटी समभागांत सर्वाधिक घसरण झाली आहे. टीसीएसच्या शेअरमध्ये सर्वाधिक ४ टक्के घसरण दिसून आली. ट्रम्प यांच्या कठोर भूमिकेचा प्रामुख्याने अमेरिकी बाजारपेठेवर अवलंबून असलेल्या क्षेत्रांवर परिणाम होण्याचा गुंतवणूकदारांचा कयास आहे. त्यामुळे गुरुवारी सकाळी व्यवहार सुरू होताच सेन्सेक्स आणि निफ्टी दोन्ही घसरले. बाजार बंद होताना सेन्सेक्स ७८०.१८ अंकांनी म्हणजेच ०.९२ टक्क्यांनी घसरून ८४,१८०.९६ वर बंद झाला तर निफ्टी २६३.९० अंकांनी म्हणजेच १.०१ टक्क्यांनी घसरून २५,८७६.८५ वर बंद झाला. आयटी आणि ऑटो क्षेत्रातील काही प्रमुख कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठी विक्री झाली. टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस, एशियन पेंट्स, मारुती, टेक महिंद्रा, इन्फोसिस आणि अल्ट्राटेक सिमेंट सारख्या शेअर्सवर दबाव दिसून आला.