पाकिस्तानचे खाण्याचे वांदे..! लोकांच्या जीवनावश्यक गरजाही होईनात पूर्ण, वाढतोय कर्जाचा डोंगर!
पाकिस्तानमध्ये नागरिकांना सध्या मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. परिस्थिती इतकी बिकट बनली आहे की, तेथील नागरिकांकडे जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी देखील पैसे नसल्याचे सांगितले जात आहे. एका पाकिस्तानी न्यूज चॅनेलने आपल्या वृत्तात दिलेल्या माहितीनुसार, आर्थिक संकटामुळे पाकिस्तानी नागरिकांना आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी नोकरीसह अन्य दुय्यम कामे देखील करावी लागत आहे. पल्स कंसल्टंटने केलेल्या सर्व्हेच्या आधारे हे वृत्त देण्यात आल्याचे या वृत्तवाहिनीने म्हटले आहे.
पल्स कंसल्टंटच्या अहवालातून माहिती समोर
या वृत्तवाहिनीने आपल्या वृतात म्हटले आहे की, पाकिस्तान मागील वर्षभरापासून महागाईचा सामना करत आहे. ज्या प्रमाणात महागाई वाढली आहे, त्या प्रमाणात देशातील उत्पन्न वाढलेले नाही. परिणामी, नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंच्या खर्चात देखील कपात करावी लागत आहे. पल्स कंसल्टंटने आपल्या अहवालात म्हटले आहे, मे २०२३ मध्ये अर्थात मागील वर्षी पाकिस्तानातील 60 टक्के लोकांनी म्हटले होते की, महागाईमुळे त्यांना आर्थिक गरजा पूर्ण करणे अवघड जात आहे. तर आता नव्याने जारी अहवालात ७४ टक्के पाकिस्तानी नागरिकांनी आपण जीवनाश्यक गरजा पूर्ण करण्यास असक्षम असल्याचे म्हटले आहे.
वाढतोय कर्जाचा डोंगर
या अहवालानुसार, पाकिस्तानी नागरिकांना आपल्या जीवनावश्यक गरजा पूर्ण करण्यासाठी नोकरीसह अन्य दुय्यम कामेही करावी लागत आहे. तर ५६ टक्के लोकांनी म्हटले आहे की, आपण कमावलेल्या कमाईमधून मागे काहीही शिल्लक राहत नाहीये. दरम्यान, पाकिस्तान आपल्या आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी विदेशी कर्जावर अवलंबून आहे. पाकिस्तानच्या अर्थ मंत्रालयाकडून मागील आठवड्यात संसदेत देण्यात आलेल्या माहितीत म्हटले आहे की, पाकिस्तानवरील कर्ज हे 67.5 लाख कोटींपर्यंत वाढले आहे. जे २००८ मध्ये केवळ 6.1 लाख कोटी रुपये इतके होते. जे १६ वर्षांमध्ये तब्बल 61.4 लाख कोटींनी वाढले आहे.