हिंडनबर्गच्या धक्क्यातून सावरला शेअर बाजार; अल्प घसरणीसह बंद, अदानींच्या 'या' शेअर्सचीही उसळी!
अमेरिकेची शॉर्ट सेलर फर्म हिंडनबर्ग रीसर्चचा अहवाल नुकताच समोर आला. ज्यात अदानी प्रकरणात सेबीच्या अध्यक्ष माधवी बूच यांचे नाव गोवण्यात आले. या अहवालानंतर भारतीय शेअर बाजारात सोमवारी (ता.१२) मोठे चढ-उतार पाहायला मिळाले. आज सकाळी शेअर बाजार लाल निशाणीवर सुरु झाला. मात्र, सुरुवातीच्या तासाभरानंतर बाजाराने पुन्हा उसळी घेतली. विशेष म्हणजे ज्या अदानी समुहावरून हिंडनबर्ग रीसर्च इतके दावे करत आहे. त्या अदानी समूहाच्या दोन कंपन्यांच्या शेअरवर, संबंधित अहवालाचा कोणताही परिणाम झालेला नाही. याशिवाय आज शेअर बाजार बंद होताना देखील अगदी अल्प घसरणीसह बंद झाले आहे.
बाजार अल्प घसरणीसह बंद
सोमवारी सकाळी (ता.१२) भारतीय शेअर बाजारात प्रामुख्याने बीएसईचा सेन्सेक्स 370 अंकांच्या घसरणीसह सुरु झाला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी देखील 155 अंकांच्या घसरणीसह सुरु झाला. त्यानंतर पुन्हा मोठी उसळी घेतली. ज्यामुळे सेन्सेक्स 81600 अंकावर तर निफ्टी 24,472 अंकांपर्यंत व्यवहार करत होता. मात्र, बाजार बंद होताना मुंबई शेअर बाजाराचा (बीएसई) सेन्सेक्स 57 अंकांच्या घसरणीसह 79,649 अंकांवर तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा (एनएसई) निफ्टी 20 अंकांच्या घसरणीसह 24,347 अंकांवर बंद झाला.
हेही वाचा : अदानी, हिंडेनबर्ग गदारोळातच …आता मुकेश अंबानींबाबत उपस्थित होतोय ‘हा’ मुद्दा!
कोणत्या शेअर्समध्ये तेजी
आज शेअर बाजारात मुंबई शेअर बाजाराच्या (बीएसई) सेन्सेक्समधील 30 शेअर्सपैकी 12 शेअर वाढीसह तर 18 शेअर घसरणीसह बंद झाले. राष्ट्रीय शेअर बाजाराच्या (एनएसई) निफ्टीच्या 50 शेअर्सपैकी 23 शेअर्स वाढीसह आणि 27 शेअर्स घसरणीसह बंद झाले. यामध्ये प्रामुख्याने ॲक्सिस बँक 1.80 टक्के, इन्फोसिस 1.51 टक्के, जेएसडब्ल्यू स्टील 1.34 टक्के, टाटा मोटर्स 0.79 टक्के. एचडीएफसी बँक 0.70 टक्के, कोटक महिंद्रा बँक 0.36 टक्के, मारुती सुझुकी 0.32 टक्के, टाटा स्टील 0.23 टक्के, एशियन पेंट्स 0.19 टक्के, आयसीआयसीआय बँक 0.08 टक्के, इंडसइंड बँक 0.07 टक्के हे शेअर्स वाढीसह बंद झाले.
याउलट आज शेअर बाजारात अदानी पोर्ट्स 2.02 टक्के, एनटीपीसी 2.02 टक्के, पॉवर ग्रिड 1.50 टक्के, एसबीआय 1.36 टक्के, नेस्ले 1.15 टक्के, महिंद्रा अँड महिंद्रा 1.10 टक्के घसरणीसह बंद झाले आहे.
अदानींच्या ‘या’ शेअर्सचीही उसळी
भारतीय शेअर बाजारात अदानी समूहाच्या नेतृत्वाखालील १० कंपन्या शेअर बाजारात लिस्टेड आहेत. सकाळी शेअर बाजार सुरु होताच १० ही कंपन्यांचे शेअर हे लाल निशाणीवर व्यवहार करत होते. मात्र, शेअर बाजाराने उसळी घेताच अदानी समूहाच्या दोन कंपन्यांच्या शेअरने देखील तेजी पकडली. अदानी ग्रीन एनर्जी कंपनीचा शेअर 1667.50 रुपयांपर्यंत घसरला होता. ज्याने पुन्हा 1815 रुपयांपर्यंत झेप घेतली आहे. याशिवाय अदानी समूहाच्या सीमेंट कंपनीचा शेअर देखील 617.75 रुपयांपर्यंत घसरला होता. जो 641 रुपयांपर्यंत वाढला आहे. अर्थात या दोन्ही कंपन्यांचे शेअर आज हिरव्या निशाणीवर व्यवहार करत होते.