
अमेरिकेचा व्हिसा मिळवणे झाले कठीण! (Photo Credit - X)
अमेरिकेच्या व्हिसा (USA Visa) पॉलिसीमध्ये मोठा बदल झाला आहे, ज्यामुळे परदेशी नागरिकांसाठी अमेरिकेतील स्वप्नांचा मार्ग अधिक खडतर होऊ शकतो. ट्रम्प प्रशासनाच्या नवीन मार्गदर्शक तत्त्वांनुसार, जर तुम्ही लठ्ठपणा (Obesity), मधुमेह (Diabetes), हृदयविकार किंवा इतर गंभीर आजारांनी त्रस्त असाल, तर अमेरिका तुमचा व्हिसा रिजेक्ट करू शकते. अमेरिकेत वास्तव्य करणाऱ्या लोकांवर वैद्यकीय खर्चाचा भार सरकारवर पडू नये, हे यामागील मुख्य उद्दिष्ट आहे.
आवेदकांची कठोर आरोग्य तपासणी
मिळालेल्या रिपोर्टनुसार, अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाने त्यांच्या दूतावासांना आणि वाणिज्य दूतावासांना व्हिसा अर्जदारांच्या आरोग्यावर विशेष लक्ष देण्याचे निर्देश दिले आहेत. नवीन नियमांनुसार, जर एखाद्या व्यक्तीवर भविष्यात अमेरिकेतील सरकारी आरोग्य सुविधांवर अवलंबून राहण्याची शक्यता असेल, तर त्याला ‘पब्लिक चार्ज’ (सार्वजनिक बोजा) मानले जाऊ शकते. या नियमामध्ये केवळ व्हिसा अर्जदारच नाही, तर त्याचे मूल किंवा वृद्ध पालक यांसारख्या आश्रितांचे आरोग्य देखील पाहिले जाईल.
व्हिसा अधिकाऱ्यांना अधिक अधिकार
तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, यापूर्वीही व्हिसा अर्जामध्ये आरोग्य तपासणी होत होती, परंतु या नवीन आदेशामुळे व्हिसा अधिकाऱ्यांना जास्त अधिकार मिळाले आहेत. ते अर्जदाराचा आरोग्य खर्च आणि संभाव्य धोका विचारात घेऊन व्हिसा नाकारू शकतात. ट्रम्प प्रशासनाने म्हटले आहे की, हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोग, श्वसन रोग, कर्करोग, मेटाबॉलिक रोग, न्यूरोलॉजिकल आणि मानसिक आरोग्य यांसारख्या आजारांवर विशेष लक्ष दिले जाईल. लठ्ठपणा (Obesity) देखील गंभीर मानला जाईल, कारण यामुळे उच्च रक्तदाब आणि दमा यांसारखे आजार होऊ शकतात.
इमिग्रेशनवर होणार परिणाम
या नवीन पॉलिसीचा उद्देश अमेरिकेतील इमिग्रेशन अधिक कठोर करणे हा आहे. गेल्या काही वर्षांमध्ये व्हाईट हाऊसने परदेशी नागरिकांची संख्या कमी केली आहे, निर्वासितांना अमेरिकेत येण्यापासून रोखले आहे आणि व्हिसाच्या वेगवेगळ्या श्रेणींचे नियम कठोर केले आहेत. याशिवाय, H-1B व्हिसा, विद्यार्थी व्हिसा आणि परदेशी माध्यम प्रतिनिधींसाठी असलेल्या तात्पुरत्या व्हिसाचे नियम देखील बदलले आहेत. या नव्या मार्गदर्शक तत्त्वांमुळे, आरोग्यविषयक समस्या असलेल्या अर्जदारांना अमेरिकेत व्हिसा मिळण्याची शक्यता कमी होईल. त्यामुळे परदेशी नागरिकांना व्हिसा अर्ज करण्यापूर्वी आपल्या आरोग्याची स्थिती आणि आर्थिक संसाधनांचे मूल्यांकन करणे आवश्यक आहे.