रशिया-युक्रेन वाद (Russia Ukraine War) दिवसागणिक चिघळत आहे. आंतरराष्ट्रीय अर्थजगतात वेगवान घडामोडी घडत आहे. भारतीय सोने बाजारावर (Indian Gold Rate) थेट परिणाम दिसून येत आहे. गेल्या काही दिवसांपासून मौल्यवान धातूंच्या भावात घौडदोड दिसून येत आहे.
देशातील प्रमुख सोने बाजारपेठेत सोन्याचा भाव उच्चांक गाठण्याच्या तयारीत आहे. आज महाराष्ट्रासह देशातील प्रमुख बाजारपेठेत सोन्याला प्रति तोळा ५४ हजार रुपये भाव मिळाला. चांदीच्या भावानं ७२ हजारांचा टप्पा गाठला आहे. सणासुदीच्या तोंडावर सोन्याच्या भावातील वाढ सर्वसामान्यांच्या डोळ्यात पाणी आणणारी ठरतं आहे. ऐन लग्नसराईत सोन्याने उच्चांक गाठल्यास लग्न खरेदीसाठीचा खर्च निश्चितच वधारणार आहे.
प्रति तोळा २४ कॅरेट सोन्याचे आजचे भाव- मुंबई- ५४३३०,पुणे-५४३६०,नाशिक-५४३६०,नागपूर-५४३८०
प्रति तोळा २२ कॅरेट सोन्याचे आजचे भाव- मुंबई- ४९८००, पुणे- ४९८३०, नाशिक-४९८३०, नागपूर-४९८५०
शेअर बाजारात सध्या अस्थिरतेचं वातावरण आहे. सुरक्षित गुंतवणुकीचा पर्याय म्हणून आजही अनेक जण सोन्याला पहिली पसंती देतात. शेअर बाजारातील अस्थिरतेचे पडसाद सोने बाजारावर दिसून येत असल्याचा अंदाज अर्थतज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.
रशिया आणि युक्रेन युद्धाचा परिणाम हा केवळ मौल्यवान धातुंवरच नव्हे तर कच्च्या तेलाच्या किमतीवर देखील झाला आहे. कच्च्या तेलाच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. गेल्या काही दिवसांमध्ये कच्च्या तेलाच्या किमती तब्बल पाच टक्क्यांनी वाढल्या असून, कच्चे तेल १३८ डॉलर प्रति बॅरलवर पोहोचले आहे. आणखी काही दिवस अशीच तणावपूर्ण परिस्थिती राहिल्यास महागाईचा भडका उडण्याची शक्यता आहे. पेट्रोल, डिझेल महागल्याने सर्वच वस्तू महाग होऊ शकतात.