भारतात पडतोय पैशाचा पाऊस; परकीय चलनाच्या साठ्याने गाठली उच्चांकी पातळी!
भारतीय अर्थव्यवस्थेसाठी आणखी एक आनंदाची बातमी आली आहे. देशाच्या परकीय चलनाच्या साठ्याने उच्च पातळी गाठली असून, हा देशातील परकीय चलनाच्या साठ्याचा आतापर्यंतचा नवीन विक्रम ठरला आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआय) दिलेल्या माहितीनुसार, भारताचा परकीय चलन साठा 692.30 अब्ज डॉलर अर्थात आतापर्यंतच्या उच्चांकावर पोहोचला आहे.
हे देखील वाचा – उद्योगपती मुकेश अंबानी दिवसाला किती कोटी कमावतात, आकडा वाचून चक्रावून जाल…
परकीय चलन साठ्यात 2.84 अब्ज डॉलरने वाढ
आरबीआयने दिलेल्या माहितीनुसार, 20 सप्टेंबर रोजी संपलेल्या आठवड्यात परकीय चलन साठा 2.84 अब्ज डॉलरने वाढला असून, हा आकडा 692.30 अब्ज डॉलरवर पोहोचला आहे. गेल्या आठवड्यात देशाच्या परकीय चलनाच्या गंगाजळीत 223 दशलक्ष डॉलरची वाढ झाली होती. नवीन 689.46 अब्ज डॉलरचा उच्चांक गाठला गेला होता.
परकीय चलन मालमत्तेत 2.06 अब्ज डॉलरने वाढ
भारतीय रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) नुकत्याच जारी केलेल्या आकडेवारीनुसार, चलन साठ्याचा महत्त्वाचा भाग मानल्या जाणाऱ्या परकीय चलन मालमत्ता 20 सप्टेंबर रोजी संपलेल्या आठवड्यात 2.06 अब्ज डॉलरने वाढ होऊन, तो 605.69 अब्ज डॉलर नोंदवला गेला आहे. डॉलरच्या रूपात व्यक्त केलेल्या परकीय चलनाच्या मालमत्तेमध्ये यूरो, पौंड आणि येन यांसारख्या गैर-अमेरिकन चलनांच्या चलनाच्या परिणामाचा समावेश होतो.
हे देखील वाचा – केवळ 2,500 रुपये भांडवलात सुरु केला व्यवसाय; आज कमावतीये वर्षाला 1 कोटी रुपये!
सोन्याच्या साठ्याच्या मूल्यातही वाढ
समीक्षाधीन आठवड्यात सोन्याच्या साठ्याचे मूल्य 726 दशलक्ष डॉलरने वाढून, 63.61 अब्ज डॉलर झाले आहे. स्पेशल ड्रॉइंग राइट्स 121 दशलक्ष डॉलरने वाढून, 18.54 बिलियन डॉलर झाले आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या आकडेवारीनुसार, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (आयएमएफ) मधील भारताचा साठा समीक्षाधीन आठवड्यात 66 दशलक्ष डॉलरने कमी होऊन, 4.46 अब्ज डॉलर झाला आहे.