केवळ 2,500 रुपये भांडवलात सुरु केला व्यवसाय; आज कमावतीये वर्षाला 1 कोटी रुपये!
सध्याच्या घडीला अनेकजण व्यवसायामध्ये उतरत आहेत. विशेष म्हणजे शिक्षण आणि आपल्या ज्ञानाच्या जोरावर अनेकांना यात मोठ्या प्रमाणात यश देखील मिळत आहे. आज आपण अशाच एका यशस्वी महिला उद्योजिकेची यशोगाथा पाहणार आहोत. ज्यांनी कमी भांडवलात नवीन व्यवसाय सुरु करत कुटूंबाला हातभार लावला आहे. ‘घरची आठवण’ अशा नावाने त्यांनी घरगुती डबे देण्याचा व्यवसाय सुरु केला. त्यांचा हा घरगुती जेवण पुरवण्याचा व्यवसाय आज वार्षिक १ कोटींचा टर्नओव्हर करत आहे.
सुरुवातीला ‘घरची आठवण’ नावाने टिफिन सेवा
ललिता पाटील (वय ३९ वर्ष) असे या महिला उद्योजिकेचे नाव असून, त्या ठाणे येथील रहिवासी आहेत. ललिता यांनी आपल्या जेवण बनवण्याच्या छंदाचे रूपांतर यशस्वी व्यवसायात केले आहे. त्यांनी सुरुवातीला घरगुती डबे पुरवत ‘घरची आठवण’ नावाने टिफिन सेवा सुरु केली. हा उपक्रम घरापासून दूर राहणाऱ्या विद्यार्थ्यांना आणि नोकरी करणाऱ्या लोकांना घरी शिजवलेले स्वादिष्ट आणि रुचकर जेवण पुरवतो. आज त्यांच्या या व्यवसायाची वार्षिक उलाढाल एक कोटी रुपयांपर्यंत पोहोचली आहे.
‘घरची आठवण’ नावाने रेस्टॉरंट सुरू
ललिता पाटील यांनी 2016 मध्ये केवळ 2,500 रुपयांमध्ये टिफिन सेवा सुरू केली. 2019 मध्ये त्यांनी ब्रिटानिया इंडस्ट्रीजची स्टार्टअप स्पर्धा जिंकून 7 लाख रुपये जिंकले. या पैशातून त्यांनी स्वत:चे ‘घरची आठवण’ हे रेस्टॉरंट सुरू केले. आता त्यांचा व्यवसाय महिन्याला ६-७ लाख रुपये कमावतो आहे.
फिजिक्स ग्रॅज्युएट असलेल्या ललिता यांचे वयाच्या 20 व्या वर्षी लग्न झाले. तिला नेहमीच आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र व्हायचे होते. सुरुवातीला त्या शिकवणी वर्गाला शिकवण्यासाठी जात होत्या. त्यानंतर त्यांनी काही काळ फार्मसी कंपनीची औषधे देखील विकली. मात्र, त्यांना त्यांच्या कामातून समाधान मिळत नव्हते. ललिताच्या पतीची गॅस एजन्सी होती. मात्र, राज्य सरकारने नवीन गॅस पाइपलाइन सुरू केल्यानंतर त्यांचा व्यवसाय ठप्प झाला.
2,500 गुंतवणुकीतून सुरु केला व्यवसाय
ज्यामुळे ललिता यांनी स्वत: व्यवसायात उतरत काहीतरी नवीन करण्याचा निर्णय घेतला. अशा परिस्थितीत 2016 मध्ये ललिताने टिफिन डबे खरेदी करण्यासाठी 2,000 रुपये आणि जाहिरात पत्रके वाटण्यासाठी 500 रुपये गुंतवून तिचा होम टिफिन व्यवसाय सुरू केला. त्यांचा व्यवसाय अल्पावधीतच ठाण्यातील कष्टकरी व्यावसायिक आणि विद्यार्थ्यांमध्ये खूपच लोकप्रिय झाला आहे.
स्टार्टअप स्पर्धेतून जिंकले ७ लाख रुपये
2019 मध्ये ललिताने एका वर्तमानपत्रात ब्रिटानिया इंडस्ट्रीजच्या स्टार्टअप स्पर्धेबद्दल वाचले. या स्पर्धेतील विजेत्याला 10 लाख रुपयांचे बक्षीस मिळणार होते. ललिताने तिची माहिती शेअर केली आणि ती स्पर्धा जिंकली. टॅक्स कपात होऊन ललिताला ७ लाख रुपये मिळाले. याच पैशांच्या जोरावर तिने आपल्या व्यवसायाला चांगलीच उभारी दिली. तिने 6 लाख रुपये रेस्टॉरंटमध्ये गुंतवले. उर्वरित पैसे राखीव निधी म्हणून ठेवला.
वार्षिक कमाई एक कोटी रुपये कमाई
याच बक्षिसाच्या पैशातून ललिताने जुलै 2019 मध्ये ठाणे येथील कोपरी येथे स्वतःचे ‘घरची आठवण’ नावाने रेस्टॉरंट सुरु केले. आज ललिताचा बिझनेस घरपोच जेवण, खानपान आणि टिफिन सेवेद्वारे दरमहा ६-७ लाख रुपये कमावतो. त्यांच्या व्यवसायाची वार्षिक कमाई एक कोटी रुपये आहे. जसजसा तिचा व्यवसाय वाढत गेला तसतसे तिच्या पतीनेही गॅस एजन्सीची नोकरी सोडली आणि ललिताला पूर्ण पाठिंबा द्यायला सुरुवात केली. या जोडप्याकडे आज दहा पूर्णवेळ कर्मचारी काम करतात. ललिता यांची ही यशोगाथा घरातून स्वतःचा व्यवसाय सुरू करणाऱ्यांसाठी नक्कीच प्रेरणादायी आहे.