नीता अंबानींचे कपडे डिझाइन करते 'ही' फॅशन डिझायनर; हजारो कोटींच्या संपत्तीची आहे मालकीण!
रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी हे केवळ भारतातीलच नव्हे तर आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. अनेकवेळा त्यांच्या महागड्या खर्चामुळे ते चर्चेत असतात. अलीकडेच त्यांच्या धाकट्या मुलाचे लग्न आणि त्यावर झालेला खर्च जगभरात चर्चेचा विषय बनला होता. अंबानी कुटुंबातील प्रत्येकजण प्रत्येक गोष्टीची अत्यंत काळजी घेत असतो. मग ते खाद्यपदार्थ असो वा कपडे असोत. याबाबत ते नेहमीच काळजी घेत असतात.
बॉलिवूड सेलिब्रिटीही आहेत त्यांचे क्लायंट
मुकेश अंबानी यांच्या पत्नी नीता अंबानीही त्यांच्या ड्रेसिंगवर विशेष लक्ष देतात. त्यांनी परिधान केलेले दागिने किंवा कपडे लोकांचे लक्ष वेधून घेतात. नीता अंबानींचे कपडेही काही वेळा खूप व्हायरल होतात. त्यामुळे आता तुम्हाला माहितीये का? नीता अंबानीची फॅशन डिझायनर कोण आहे? अनिता डोंगरे असे तिचे नाव आहे. अनिता देखील सेलिब्रिटीपेक्षा कमी नाही. अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी त्यांचे क्लायंट आहेत. यामध्ये प्रियांका चोप्रा आणि आलिया भट्टचाही समावेश आहे.
जगभरात 270 पेक्षा जास्त स्टोअर्स
अनिता डोंगरे या प्रसिद्ध फॅशन डिझायनर आहेत. केवळ दोन शिलाई मशिनपासून त्यांनी आपल्या करिअरची सुरुवात केली होती. आज त्यांची जगभरात 270 पेक्षा जास्त स्टोअर्स आहेत. ६१ वर्षांच्या अनिताला तिच्या आईकडून शिवणकामाचा वारसा मिळाला आहे. त्यांची आई शिवणकाम करायची. त्यामुळे अनितालाही लहानपणापासूनच फॅशनची आवड निर्माण झाली होती. मोठी झाल्यानंतर त्यांनी याच क्षेत्रात आपले करिअर केले आहे.
सुरुवातीला अपयश, नाही मानली हार
अनिताने सुरुवातीला तिच्या बहिणीसोबत 1995 मध्ये पाश्चात्य कपडे शिवण्यास सुरुवात केली. अनिताने आपला व्यवसाय सुरू करण्यासाठी वडिलांकडून पैसे उसने घेतले होते. सुरुवातीला अनिताने हे कपडे स्थानिक दुकानदारांना विकले. यावेळी त्यांनी अनेक मॉल्स आणि ब्रँड्सशी संपर्कही साधला. मात्र त्यांची निराशा झाली. मात्र, तिने प्रयत्न सुरूच ठेवले. नंतर अनिताने अॅन्ड नावाचा स्वतःचा ब्रँड सुरू केला. लवकरच या ब्रँडच्या कपड्यांची मागणी वाढू लागली. 2015 मध्ये तिने तिच्या कंपनीचा ‘हाऊस ऑफ अनिता डोंगरे’ म्हणून री-ब्रँड केला. तिच्या ब्रँडमध्ये आता अॅन्ड, ग्लोबल देसी, अनिता डोंगरे ब्राइडल कॉउचर, अनिता डोंगरे ग्रासरूट्स आणि अनिता डोंगरे पिंक सिटी इत्यादींचा समावेश आहे.
किती आहे एकूण संपत्ती?
अनिताचा ब्रँड गेल्या काही वर्षात चांगलाच विकसित झाला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, तिच्या व्यवसायाची वार्षिक कमाई 1000 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. फोर्ब्सने तिला भारतातील सर्वात श्रीमंत महिला फॅशन डिझायनर म्हणून सन्मान दिला आहे. फोर्ब्सच्या यादीनुसार, अनिताची एकूण संपत्ती 10 मिलियन डॉलर (सुमारे 84 कोटी रुपये) पेक्षा अधिक आहे.