
फोटो सौजन्य- iStock
केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (CBDT)ने कर संकलनाची आकडेवारी जारी केली आहे. देशातील एकूण कर संकलन हे 19.62 लाख कोटी रुपये आहे. यानुसार 2023-24 मध्ये प्रत्यक्ष कर संकलनामध्ये महाराष्ट्रातून सर्वात जास्त कर भरणा करण्यात आला आहे. महाराष्ट्रातून तब्बल 7.61 लाख कोटी रुपयांहून अधिक कर भरणा केला गेला आहे. या आकडेवारूनुसारच देशातील तब्बल 39 टक्के प्रत्यक्ष कर हा एकट्या महाराष्ट्रातून संकलित केला गेला आहे. त्यामुळे देशात महाराष्ट्राने आपले अव्वल स्थान कायम ठेवले आहे.
दुसरा क्रमांकांच्या राज्याच्या तुलनेतही महाराष्ट्रातून 5 लाखाहून अधिक कर भरणा
महाराष्ट्रानंतर प्रत्यक्ष कर (Direct Tax) भरण्यामध्ये दुसरे स्थान हे कर्नाटकचे आहे. आर्थिक वर्ष 2023 ते 24 मध्ये कर्नाटक राज्यातून 2.35 लाख कोटी रुपये कर संकलन केले गेले आहे. पहिल्या आणि दुसऱ्या स्थानामधील कर संकलनाची तुलना केली तरीही महाराष्ट्रातून 5 लाखाहून अधिक कर भरणा केला गेला आहे. तिसऱ्या क्रमांकावर असणारे राज्य आहे दिल्ली. दिल्लीतून 2.3 लाख कोटी रुपयांचे योगदान कर संकलनामध्ये दिले गेले आहे.
इतर राज्यांमधील कर संकलन
देशात प्रत्यक्ष करण भरण्यामध्ये चौथ्या क्रमांकावर तमिळनाडू राज्य आहे. या राज्यातून 1.27 लाख कोटी रुपये प्रत्यक्ष कर संकलन झाले आहे. त्यानंतर पाचव्या स्थानी गुजरातचा क्रमांक लागत आहे. गुजरातमधून 23-24 या आर्थिक वर्षात 93300 कोटी रुपये कर भरण्यात आला आहे. सहाव्या स्थानी 84439 कोटी रुपये कर भरणा करत तेलंगाणा राज्य आहे. तर सातव्या स्थानी हरयाणा आहे. हरयाणातून 70947 कोटी रुपये कर भरण्यात आला आहे. या यादीमध्ये पश्चिम बंगालचा आठवा क्रमांक असून पश्चिम बंगालमधून मागील आर्थिक वर्षात 60,374 कोटी रुपये कर भरण्यात आला आहे.
काय आहे उत्तरप्रदेश बिहारमधील कर संकलन
भारतातील लोकसंख्येच्या दृष्टीने सर्वात मोठे राज्य असलेल्या उत्तरप्रदेशमधून केवळ 48333.44 कोटी रुपये कर भरण्यात आला आहे. तर त्याच्या शेजारी असणाऱ्या आणि लोकसंख्येच्या आधारेही भारतातील मोठे राज्य असेलेल्या बिहारमधून केवळ 6692.73 कोटी रुपये प्रत्यक्ष कर भरण्यात आला आहे. त्यामुळे प्रगतीपथावरील राज्यांकडून देशात मोठ्याप्रमाणात कर भरला जात आहे. त्यामध्ये महाराष्ट्राचे योगदान अतुलनीय आहे.