
Adani Group MSRDC Project: वांद्रे रेक्लेमेशनचा कायापालट! तब्बल 'इतक्या' कोटींचे एमएसआरडीसीच्या पुनर्विकास टेंडर अदानी ग्रुपला
Adani Group MSRDC Project: वांद्रे रेक्लेमेशन येथील महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या मुख्यालयाचा पुनर्विकास करण्यासाठी हे कार्यालय रिकामे करण्यात आले आहे. या पुनर्विकासातून सुमारे ८ हजार कोटी रुपये (MSRDC) एमएसआरडीसीला मिळणार आहेत. तब्बल २४ एकर जागेच्या पुनर्विकासाचे हे टेंडर अदानी समूहाला मिळाले आहे. वांद्रे येथील मुख्यालयाचे बांधकाम फेब्रुवारीमध्ये सुरू होणार आहे. पुढील पाच वर्षांत पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण होईल. तर दुसऱ्या टप्प्याचे काम मे २०२८ मध्ये सुरू केले जाणार आहे. त्यासाठी या आठवड्यापासून एमएसआरडीसीचे कार्यालय दादर येथील कोहिनूर स्क्वेअर येथे स्थलांतरित करण्यात आले आहे.
वांद्रे-वरळी सागरी सेतूलगत सात एकर जागेवर एमएसआरडीसीचे मुख्यालय आहे. मुख्यालयासमोर कास्टिंग यार्डची २२ एकर जागा आहे. दोन्ही मिळून २९ एकर जागेचा विकास करण्याचा निर्णय एमएसआरडीसीने घेतला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून एमएसआरडीसी येथील मोकळ्या भूखंडाचा वापर कास्टिंग यार्ड म्हणून करीत होती. आता या जागेवर निवासी वा अनिवासी उत्तुंग इमारत संयुक्त भागीदारीतून बांधण्यात येणार आहे. यामुळे MSRDC ला मोठ्या प्रमाणात फायदा होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. याचे बांधकाम पूर्ण होण्यासाठी सरकारकडून महसूल ही जाहीर करण्यात आला आहे.
हेही वाचा: Stock Market Today: कसं असणार आज शेअर बाजारातील वातावरण? वाचा तज्ज्ञांचा अंदाज
एमएसआरडीसीकडून कोट्यवधीचे रस्ते विकास प्रकल्प राबवण्यात येत आहेत. अशावेळी निधीची चणचण कमी करण्यासाठी या जागेचा विकास करून त्यातून आठ हजार कोटींहून अधिकचा महसूल मिळविण्याचा एमएसआरडीसीचा प्रयत्न आहे. या २९ एकर जागेच्या विकासासाठी एमएसआरडीसीने जानेवारीत टेंडर प्रसिद्ध केले होते. यामध्ये अदानी, एल. अॅण्ड टी. तसेच मायफेअर या कंपन्यांनी टेक्निकल टेंडर भरले होते. याची छाननी करून एमएसआरडीसीने कमर्शियल टेंडर खुली केली. यात अदानी आणि एलअँडटीचे टेंडर पात्र ठरले. त्यातही अदानीने सार्वधिक बोली लावली. एमएसआरडीसीने लावलेल्या बोलीपेक्षा अदानीने २२.७ टक्क्यांनी अधिक बोली लावली. तर एलअँडटीने बोलीच्या १८ टक्के अधिक बोली लावली. साहजिकच अदानीची बोली सर्वाधिक असल्याने हे टेंडर त्यांनाच मिळाले आहे.