मुकेश अंबानी श्रीमंतांमध्ये प्रथम स्थानी; ... तरीही आशियात पहिल्या पाच कंपन्यांमध्ये 'या' देशाच्या कंपन्या!
गेल्या काही वर्षांपासून देशातील प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी आणि गौतम अदानी यांच्यामध्ये आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती या बहुमानासाठी चढाओढ सुरु आहे. सध्या मुकेश अंबानींकडे असणारा हा बहुमान, चालू वर्षीच्या सुरुवातीला जानेवारी महिन्यात अदानी समूहाचे प्रमुख गौतम अदानी यांच्याकडे होता. मात्र, आता मुकेश अंबानी हे आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असले तरी त्यांची रिलायन्स इंडस्ट्रीज ही कंपनी मार्केट कॅपमध्ये सहाव्या क्रमांकावर आहे. विशेष म्हणजे आशियातील पहिल्या पाच कंपन्यांमध्ये चीनच्या कंपन्या आहेत.
रिलायन्स आशियातील सहावी सर्वात मोठी कंपनी
रिलायन्स इंडस्ट्रीज ही आशियातील सहावी सर्वात मोठी कंपनी आहे. कंपनीचे मार्केट कॅप सुमारे 234 अब्ज डॉलर इतके आहे. शुक्रवारी (ता.९) शेअर बाजार बंद होताना रिलायन्स इंडस्ट्रीजचे शेअर्स 50 रुपयांहून अधिक वाढले. तर एनएसई 2948.60 रुपयांवर बंद झाले. गेल्या एका वर्षात कंपनीच्या शेअरमध्ये 15 टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. कंपनीचे मार्केट कॅप 233.61 अब्ज डॉलर इतके झाले आहे. रिलायन्स इंडस्ट्रीज ही जगातील 46 वी सर्वात मोठी कंपनी आहे. अलीकडेच, कंपनीने सलग 21 व्या वर्षी फॉर्च्यून ग्लोबल 500 यादीत स्थान मिळवले आहे. या यादीत कंपनी 86 व्या क्रमांकावर आहे.
हेही वाचा : अदानी, हिंडेनबर्ग गदारोळातच …आता मुकेश अंबानींबाबत उपस्थित होतोय ‘हा’ मुद्दा!
‘या’ आहेत आशियातील पहिल्या पाच कंपन्या
१. तैवान सेमीकंडक्टर मॅन्युफॅक्चरिंग कंपनी : आशियातील सर्वात मौल्यवान कंपनी ‘टीएसएमसी’ ही आहे. तैवान सेमीकंडक्टर मॅन्युफॅक्चरिंग कंपनी (टीएसएमसी) कंपनीचे मार्केट कॅप 646 अब्ज डॉलर्स (सुमारे 54 लाख कोटी रुपये) इतके आहे. कंपनीचे संस्थापक, अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी मॉरिस चांग आहेत. कंपनीमध्ये ७३ हजारांहून अधिक कर्मचारी काम करतात. २०२३ मध्ये या कंपनीचा महसूल ७१ अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त होता.
२. टेन्सेंट होल्डिंग्स लिमिटेड : चीनची टेन्सेंट होल्डिंग्स लिमिटेड ही कंपनी आशिया खंडात दुसऱ्या क्रमांकावर आहे. गेमिंग क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या या कंपनीचे मार्केट कॅप 421 अब्ज डॉलर्स इतके आहे. ही जगातील सर्वात मोठी गेमिंग कंपनी देखील मानली जाते. तिचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी पोनी मा आहेत. कंपनीमध्ये 1 लाखांहून अधिक कर्मचारी आहेत. 2023 मध्ये या कंपनीचा महसूल 86 अब्ज डॉलर्स इतका होता.
३. सॅमसंग ग्रुप : दक्षिण कोरियाची सॅमसंग ही कंपनी आशियातील तिसरी सर्वात मोठी कंपनी आहे. ही कंपनी टीव्ही, फोन आणि लॅपटॉपसारख्या इलेक्ट्रॉनिक उपकरणांची निर्मिती करते. या कंपनीचे मार्केट कॅप सुमारे 354 अब्ज डॉलर्स आहे. तिचे अध्यक्ष ली जे योंग हे आहेत.
४. इंडस्ट्रियल अँड कमर्शियल बँक ऑफ चायना : इंडस्ट्रियल अँड कमर्शियल बँक ऑफ चायना (ICBC) ही आशियातील चौथी मोठी कंपनी आहे. चीनची ही सर्वात मोठी बँक 1984 मध्ये बीजिंगमध्ये स्थापन झाली. बँकेचे मार्केट कॅप 269 अब्ज डॉलर इतके आहे. ICBC चे अध्यक्ष लियाओ लिन हे आहेत. बँकेचा महसूल 105 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त आहे.
५. क्विचौ मौताई : क्विचौ मौताई ही चिनी कंपनी दारू व्यवसायाशी निगडीत आहे. तिची स्थापना 1951 मध्ये झाली. चीनशिवाय या कंपनीची दारू इतर देशांमध्येही प्रसिद्ध आहे. कंपनीचे मार्केट कॅप 251 अब्ज डॉलर्स इतके आहे.