
Reliance आंध्र प्रदेशमध्ये करणार महागुंतवणूक ( सौजन्य - सोशल मीडिया )
कंपनी आंध्र प्रदेशमध्ये कॉम्प्रेस्ड बायोगॅस CBG प्लांट उभारण्यासाठी १ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. यामुळे ३ लाखांहून अधिक रोजगार निर्माण होतील आणि राज्याला अंदाजे ६०,००० कोटी रुपयांचा महसूल मिळेल. मदनपल्ले येथील रायलसीमा हॉर्टिकल्चर हब आणि इंडियन स्कूल ऑफ ॲग्रीकल्चरच्या पायाभरणी समारंभात बोलताना अनंत अंबानी म्हणाले की, या नवीन संस्थेला पाठिंबा देण्यासाठी रिलायन्स सरकार आणि शेतकऱ्यांसोबत मिळून काम करेल.
अनंत अंबानी म्हणाले, “आज, ४०,००० कोटी रुपयांच्या गुंतवणुकीसह रायलसीमा हॉर्टिकल्चर हब भारताच्या विकासाच्या गाथेत आणखी एक मैलाचा दगड ठरणार आहे.” अंबानींनी इंडियन स्कूल ऑफ ॲग्रीकल्चरचे वर्णन तंत्रज्ञान आणि शेतकऱ्यांच्या समृद्धीवर लक्ष केंद्रित करणारी एक नवीन संस्था या स्वरुपात केलं आहे.
आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्रबाबू नायडू यांच्याशी बोलताना अनंत अंबानी म्हणाले, “पंचवीस वर्षांपूर्वी तुम्ही इंडियन स्कूल ऑफ बिझनेस ISB हैदराबादमध्ये आणले. आज तुम्ही भारतीय शेतकऱ्याला त्याचे स्वतःचे ISB देत आहात.” ते पुढे म्हणाले, “भारताने जगाला अनेक सीईओ दिले आहेत. आता, ISA भारताच्या शेतकऱ्याला त्याच्या शेताचा सीईओ बनवेल.”
अनंत अंबानी म्हणाले की, ही शाळा कृत्रिम बुद्धिमत्ता आणि पारंपरिक शेती ज्ञानाला जोडून याचा संगम ठरेल. यामध्ये कीड सूचना, पिकांच्या आरोग्याचा नकाशा तयार करण्यासाठी ड्रोन, रोबोटिक्स, क्लाउड कंप्युटिंग, मार्केट इंटेलिजन्स आणि ग्रीनहाऊस तंत्रज्ञान यांसारख्या तंत्रज्ञानाचा समावेश असेल.
अनंत म्हणाले, “रिलायन्सच्या हरित ऊर्जा व्यवसायाच्या माध्यमातून, मला आपल्या ‘अन्नदात्यां’ना ‘ऊर्जादात्यां’मध्ये रूपांतरित करण्यास मदत करण्याची संधी दिसत आहे.” ते पुढे म्हणाले, “आपले शेतकरी, जे भारताची अन्न सुरक्षा सुनिश्चित करतात, ते आता भारताची ऊर्जा सुरक्षा देखील मजबूत करतील. ज्यामुळे भारत ऊर्जा-आत्मनिर्भर होईल.”
PM Kisan योजनेचे 2 हजार एकाच घरात बाप मुलगा दोघांनाही मिळतील? नेमका काय आहे सरकारी नियम?