अनिल अंबानीनी खेळली मोठी खेळी
अनिल अंबानी यांची कंपनी रिलायन्स पॉवरने देशात हरित ऊर्जेला प्रोत्साहन देण्यासाठी एक मोठे पाऊल उचलले आहे. धाकट्या अंबानींची कंपनी, रिलायन्स एनयू सनटेकने, सोलर एनर्जी कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (SECI) सोबत २५ वर्षांचा करार केला आहे. याअंतर्गत, कंपनी ९३० मेगावॅट सौर ऊर्जा आणि ४६५ मेगावॅट / १,८६० मेगावॅट-तास बॅटरी एनर्जी स्टोरेज सिस्टम (BESS) प्रदान करेल. हा आशियातील सर्वात मोठा सौर-BESS प्रकल्प असेल.
10000 कोटींची गुंतवणूक
हा प्रकल्प रिलायन्स पॉवर पुढील २४ महिन्यांत पूर्ण करेल. यासाठी कंपनीकडून १०,००० कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाईल. या प्रकल्पातून वीज ३.५३ रुपये प्रति किलोवॅट तास (kWh) दराने दिली जाईल. हा देशातील सर्वात मोठा आणि महत्त्वाचा हरित ऊर्जा करार आहे. कंपनी ९३० मेगावॅट वीज पुरवण्यासाठी १,७०० मेगावॅटपेक्षा जास्त सौरऊर्जा क्षमता स्थापित करेल. त्यात आधुनिक बॅटरी स्टोरेज सिस्टीम देखील असेल, ज्यामुळे वीज पुरवठा स्थिर राहील.
संजय खन्ना यांनी बीपीसीएलचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणून अतिरिक्त कार्यभार स्वीकारला
SECI लिलाव
डिसेंबर २०२४ मध्ये SECI च्या Tranche XVII लिलावात हा प्रकल्प रिलायन्स NU Suntech ला देण्यात आला. लिलावात रिलायन्सने सर्वाधिक ९३० मेगावॅट सौर क्षमता आणि ४६५ मेगावॅट/१,८६० मेगावॅट-तास BESS मिळवले. या लिलावात पाच मोठ्या वीज कंपन्यांनी भाग घेतला. त्यांनी २००० मेगावॅट सौर आणि १००० मेगावॅट / ४००० मेगावॅट-तास BESS क्षमतेसाठी निविदा मागवल्या. रिलायन्स पॉवरने SECI ला ३७८ कोटी रुपयांची परफॉर्मन्स बँक गॅरंटी (PBG) दिली आहे. लिलाव, निवाडा आणि कराराचे काम कंपनीने पाच महिन्यांत पूर्ण केले.
देशाच्या ग्रीन एनर्जीत महत्त्वाचे योगदान
रिलायन्स पॉवरने म्हटले आहे की हा प्रकल्प एक मोठे पाऊल आहे. कंपनीने एका निवेदनात म्हटले आहे की, ‘हा आमच्या धोरणाचा एक महत्त्वाचा भाग आहे. आम्ही देशात स्वच्छ ऊर्जेसाठी काम करण्यास वचनबद्ध आहोत. या प्रकल्पामुळे देशाचे अक्षय ऊर्जा लक्ष्य साध्य होण्यास मदत होईल. याशिवाय, यामुळे देशात ऊर्जा साठवणुकीची सुविधा देखील वाढेल. वीज निर्मितीव्यतिरिक्त, हा प्रकल्प ग्रीड स्थिर ठेवण्यासदेखील मदत करेल. बॅटरी स्टोरेज सिस्टीमद्वारे गरज पडल्यास सौरऊर्जेचा वापर करता येतो.
शेतकऱ्यांसाठी खूशखबर, २५० लाख टन गहू खरेदीवर ‘या’ शेतकऱ्यांना मिळणार ६२,१५५ कोटी रुपये
रिलायन्स पॉवर शेअर तेजीत
१०,००० कोटी रुपयांच्या गुंतवणुकीच्या बातम्या आल्यानंतर अनिल अंबानी यांच्या कंपनी रिलायन्स पॉवरच्या शेअर्समध्ये वाढ होताना दिसत आहे. गुरुवारी कंपनीचा शेअर ३९.९८ रुपयांवर बंद झाला. शुक्रवारी ट्रेडिंग सत्राच्या सुरुवातीला, शेअर ४०.७५ रुपयांवर उघडला. ट्रेडिंग सत्रादरम्यान शेअरने ₹ ४१.५४ चा उच्चांक गाठला. शेअरमध्ये वाढ झाल्यानंतर कंपनीचे मार्केट कॅप १६,३१७ कोटी रुपयांपर्यंत वाढले आहे.