सेबीच्या प्रमुख माधबी बुच यांच्यावर काँग्रेसकडून गंभीर आरोप, वाचा... काय आहे नेमकं प्रकरण
अलिकडेच सेबीच्या प्रमुख माधबी बुच यांच्यावर हिंडनबर्ग रिसर्चने गंभीर आरोप केले होते. अशातच आता कॉंग्रेस पक्षाने माधबी बुच यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले आहेत. काँग्रेसने आज (ता.२) सेबीच्या प्रमुख माधबी बुच यांच्यावर आरोप करताना म्हटले आहे की, माधबी या 2017 ते 2021 पर्यंत सेबीच्या पूर्णवेळ सदस्य होत्या. 2022 मध्ये त्या अध्यक्षा झाल्या. असे असतानाच त्यांनी 2017 ते 2024 दरम्यान आयसीआयसीआय बँकेकडून 16.80 कोटी रुपये पगार घेतला आहे. काँग्रेसचे प्रवक्ते पवन खेडा यांनी पत्रकार परिषद घेत हे गंभीर आरोप केले आहे.
सेबीच्या प्रामाणिकपणावर प्रश्नचिन्ह उपस्थित
दरम्यान, या प्रकरणी पवन खेडा यांनी सेबीच्या प्रामाणिकपणावर प्रश्न उपस्थित केले आहे. सेबीने निःपक्षपातीपणा आणि स्वातंत्र्य राखले पाहिजे असे त्यांनी म्हटले आहे. सेबीचे प्रमुख आयसीआयसीआय बँकेसारख्या खासगी संस्थेतून पगार घेत असताना सेबीच्या निःपक्षपातीपणाची खात्री कशी करता येईल, असा सवाल खेडा यांनी उपस्थित केला आहे. सेबीवर कोणताही ‘बाह्य प्रभाव’ नाही ना, याची खात्री करण्यासाठी या प्रकरणाची चौकशी करण्यात यावी, अशी मागणीही काँग्रेसकडून यावेळी करण्यात आली आहे.
हिंडेनबर्ग रिसर्च काय आरोप केला होता
गेल्या महिन्यात यूएस शॉर्ट सेलिंग कंपनी हिंडेनबर्ग रिसर्चने सेबीच्या प्रमुख माधबी पुरी आणि त्यांचे पती धवल बुच यांच्यावर अदानी घोटाळ्याशी संबंध असल्याचा आरोप केला होता. हिंडेनबर्ग रिसर्चने कागदपत्रांचा हवाला देत म्हटले होते की, बुच आणि त्यांच्या पतीचे एका ऑफशोअर फंडात स्टॉक होते. ज्यात गौतम अदानी यांचे भाऊ विनोद अदानी यांनी मोठ्या प्रमाणात पैसे गुंतवले होते. असा आरोप हिंडेनबर्गने माधबी पुरी बुच यांच्यावर केला होता.
फेटाळले होते सर्व आरोप
हिंडेनबर्ग रिसर्चचा हा अहवाल समोर आल्यानंतर माधबी पुरी बुच आणि त्यांचे पती यांनी संयुक्त निवेदन जारी करत, हिंडेनबर्गचे आरोप फेटाळून लावले होते. अहवालात करण्यात आलेले आरोप पूर्णपणे निराधार असल्याचे त्यांनी म्हटले होते. यांत अजिबात तथ्य नाही. आपले जीवन आणि आर्थिक परिस्थिती खुल्या पुस्तकासारखी असल्याचेही त्यांनी त्यावेळी निवेदनात म्हटले होते.