
प्रशांत जगतापांना भाजपमध्येही जाता आले असते, पण...; पृथ्वीराज चव्हाण यांचे गौरवोद्गार
पुणे शहरातील वानवडी-साळुंके विहार या प्रभाग क्रमांक १८ मधील काँग्रेस-शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आघाडीचे अधिकृत उमेदवार प्रशांत जगताप, रत्नप्रभा जगताप, ॲड. साहिल केदारी आणि शमिका जांभुळकर यांच्या प्रचारार्थ सभेमध्ये ते बोलत होते.
चव्हाण म्हणाले, ‘प्रशांत जगताप दोन वेळा या भागाचे नगरसेवक होते आणि त्यांनी शहराचे महापौर पदही भूषविले आहे. त्यांच्या मातोश्री रत्नप्रभा जगताप यांनीही दोन वेळा नगरसेवक म्हणून काम पाहिले आहे. साहिल केदारी आणि शमिका जांभुळकर हे दोन्ही उमेदवार उच्चशिक्षित आहे. चारही उमेदवार जनतेची सेवा करण्यासाठी तत्पर आहेत आणि त्यामुळे प्रभागाचे सोने करायचे असेल, तर येथील जनतेने या चारही उमेदवारांना निवडून द्यावे.’
भाजपवर टीका करताना ते म्हणाले, ‘गेल्या १२ वर्षांमध्ये केंद्र, राज्यात भाजपची सत्ता आहे. महापालिकेमध्येही भाजपची सत्ता होती. या काळात भाजपने जनतेला केवळ फसवले आहे. त्यामुळे महापालिका निवडणुकीत जनतेने भाजपला या फसवणुकीचा जाब विचारला पाहिजे. काँग्रेसच्या सत्तेच्या काळामध्ये पुण्यामध्ये विकासकामे केली आहेत. गेल्या १२ वर्षांमध्ये भाजपकडे सत्ता असताना पुण्यात कोणती विकासकामे केली? भाजपने केवळ भ्रष्टाचार करण्याचे काम केले आहे. त्यांच्या या कारभाराचा जाब विचारण्याचे काम सर्वांनी केले पाहिजे. सत्तेच्या जोरावर भाजपने बरीच नौटंकी केली आहे.’
प्रशांत जगताप यांनीही आपली भूमिका मांडताना भाजप-महायुतीच्या कारभारावर टीका केली. ते म्हणाले, ‘वानवडी भागातील नागरिकांनी १२ वर्षांमध्ये वेगवेगळे खासदार-आमदार, मंत्री पाहिले आहेत. त्यांनी काय दिवे लावले, हेही पाहून झाले. त्यांनी या भागासाठी कोणताही विकास केला नाही. पण मी वानवडी भागात ई-लर्निंग शाळेसह मोठ्या प्रमाणात विकासकामे केली. भाजपच्या नेत्यांनी केलेली १५ कोटी रुपयांची कामे सांगावीत, असे खुले आव्हान मी देतो. पण त्यांनी या भागात कोणती कामेच केली नाहीत. गुन्हेगारांना प्रोत्साहन देणे, हेच त्यांचे काम आहे. देशातील जनतेने नरेंद्र मोदींकडे पाहून मतदान केले, पण जनतेच्या पदरात काय पडले? वाढती महागाई, बेरोजगारी, गुन्हेगारी या सगळ्यांचे प्रमाण वाढतच आहे. आज सामान्य जनता त्रस्त झाली आहे. पण, केंद्र आणि राज्य सरकारचे लक्ष केवळ भ्रष्टाचारावर आहे.’ देवेंद्र फडणवीस, अजित पवार, एकनाथ शिंदे तुमच्या-आमच्या घरांवर दरोडा घालत आहेत. ज्यांनी चोऱ्या केल्या, दरोडे घातले, त्यांनाच भाजपने उमेदवारी दिली आहे. आमची लढाई या चोरी करणाऱ्यांविरोधात आहे. आझादनगर वसाहतीवर आरक्षण टाकण्याचे काम करणाऱ्यांविरोधात आपली लढाई आहे. या सर्वांविरोधात लढणाऱ्या प्रशांत जगतापला तुम्ही मतदान करणार की तुमच्यावर आजवर अन्याय करणाऱ्या नेत्याच्या मुलाला तुम्ही मतदान करणार, असे म्हणत प्रशांत जगताप यांनी माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर यांना टोला लगावला.