
(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
१९८९ मध्ये करण्यात आलेले ‘टाटा सन्स’च्या share transfer हे अवैध होते, असा आरोप या नोटिसीमध्ये करण्यात आला आहे. ज्यांना या नोटिसा बजावण्यात आल्या आहेत, त्यामध्ये ‘टाटा सन्स’चे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन आणि नोएल टाटा यांचा समावेश आहे. ट्रस्टला कथितरित्या झालेल्या नुकसानीपोटी भरपाई देण्याची मागणी या नोटिसीद्वारे करण्यात आली आहे. तसेच, विहित मुदतीमध्ये यावर समाधानकारक प्रतिसाद किंवा तोडगा निघाला नाही तर दिवाणी आणि फौजदारी कायदेशीर कारवाई सुरू केली जाईल, असा इशाराही या नोटिसमध्ये देण्यात आला आहे.
हा वाद ‘नवाजबाइ रतन टाटा ट्रस्ट’ NR Tata Trust च्या मालकीच्या ‘टाटा सन्स’च्या ८३३ इक्विटी शेअरर्सभोवती केंद्रित आहे. जानेवारी १९८९ मध्ये, हे समभाग धर्मादाय ट्रस्टच्या मालकीतून काढून घेऊन, दिवंगत नवल एच. टाटा यांच्या वैयक्तिक नावावर हस्तांतरित करण्यात आले होते, असा आरोप करण्यात आला आहे. सुनील तुलसीराम पाटीलखेडे यांच्या वतीने ॲडव्होकेट कात्यायनी अग्रवाल यांनी ही नोटीस बजावली आहे. पाटीलखेडे यांनी यापूर्वी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेऊन, ८ मे रोजी नियोजित असलेली ‘सर रतन टाटा ट्रस्ट’ आणि ‘दोराबजी टाटा ट्रस्ट’ यांची एक महत्त्वपूर्ण बैठक थांबवण्याची मागणीही केली होती.
या नोटीसमध्ये असा दावा करण्यात आला आहे की, या हस्तांतरणापोटी कोणतेही योग्य ते मूल्य अदा करण्यात आले नाही, तसेच विश्वस्तांची आवश्यक ती मंजुरीही प्राप्त करण्यात आली नाही. नोटीसमध्ये नमूद केल्यानुसार, ‘एन.आर. टाटा ट्रस्ट’ची स्थापना डिसेंबर १९७४ मध्ये रतन टाटा यांनी एक सार्वजनिक धर्मादाय विश्वस्त संस्था म्हणून केली होती. शिक्षण आणि जनकल्याणकारी उपक्रमांना चालना देणे हे या संस्थेचे मुख्य उद्दिष्ट होते. संस्थेच्या स्थापनेच्या वेळी, ‘सर रतन टाटा ट्रस्ट’ने ‘टाटा सन्स’चे ६२५ इक्विटी शेअर्स आणि ३४ प्रेफरन्स शेअर्स या नवीन ट्रस्टला देणगी म्हणून दिले होते. त्यानंतर, १९७९ मध्ये बोनस शेअर्स प्राप्त झाल्यामुळे, शेअर्सची एकूण संख्या वाढून ८३३ झाली.
या नोटीसमध्ये असा आरोप करण्यात आला आहे की, ११ जानेवारी १९८९ रोजी नवल एच. टाटा यांनी विश्वस्त पदाचा राजीनामा दिल्यानंतर बरोबर एका आठवड्याने विशिष्टतः १८ जानेवारी १९८९ रोजी ट्रस्टची संपूर्ण मालमत्ता त्यांच्या वैयक्तिक नावावर हस्तांतरित करण्यात आली. टाटा सन्सच्या Share Register मध्ये, या हस्तांतरणाचे मूल्य ‘शून्य’ असे नोंदवले गेले होते. या कायदेशीर नोटीसमध्ये अनेक तांत्रिक आणि वैधानिक अनियमिततांवर प्रकाश टाकण्यात आला आहे. पाटीलखेडे यांच्या वतीने खालील बाबी मांडण्यात आल्या आहेत.
या हस्तांतरणास अधिकृत संमती देणारा विश्वस्तांचा कोणताही ठराव अभिलेखांवर उपलब्ध नाही.
Transfer Deed किंवा कंपनी कायदा, १९५६ च्या कलम १०८ अन्वये अनिवार्य असलेल्या वैधानिक ‘फॉर्म ७B’ बाबतच्या आवश्यक तरतुदींचे पालन करण्यात आले नाही.
या व्यवहाराचे वर्णन ‘Related Party Transaction असे करण्यात आले आहे; कारण त्या वेळी नवल टाटा हे ट्रस्टशी संबंधित होते आणि ते रतन टाटा यांचे वडील होते.
ट्रस्टची मालमत्ता वैयक्तिक फायद्यासाठी एखाद्या माजी विश्वस्ताच्या नावावर हस्तांतरित करणे, हे Fiduciary Duty थेट भंग असल्याचे या नोटीसमध्ये प्रतिपादन करण्यात आले आहे. या व्यवहाराचा कोणताही लाभ खुद्द ट्रस्टला झाला नाही, तसेच ज्यांच्या कल्याणासाठी या धर्मादाय ट्रस्टची मूळतः स्थापना करण्यात आली होती, त्या लाभार्थींनाही याचा काहीच फायदा झाला नाही.
ही कायदेशीर नोटीस केवळ नोएल टाटा आणि एन. चंद्रशेखरन यांच्यापुरतीच मर्यादित नाही. यामध्ये ‘टाटा सन्स’ आणि ‘टाटा ट्रस्ट्स’ यांच्याशी संबंधित अनेक प्रभावशाली नावांचा समावेश आहे. वेणू श्रीनिवासन, विजय सिंग, जिमी टाटा, जहांगीर जहांगीर, दारियस खांबाटा, सिद्धार्थ शर्मा, नेव्हिल टाटा आणि भास्कर भट यांना नोटिसा पाठवण्यात आल्या आहेत.