राज्यात सध्या तुरीचे बाजारभाव गेल्या काही काळापासून चांगलेच तेजीत असल्याचे पाहायला मिळत आहे. मागील तीन ते चार दिवसांमध्ये प्रमुख बाजार समिती असलेल्या अकोला बाजार समितीत तुरीचे दर उच्चांकी पातळीवर यार अर्थात 13 हजार 800 रुपये प्रति क्विंटलपर्यंत पोहचले आहेत. ज्यामुळे सध्या राज्यात तुरीला यंदाच्या हंगामातील सर्वोच्च दर मिळत असल्याचे पाहायला मिळत आहे. मात्र, आता खरीप हंगामाच्या तोंडावर तुरीच्या दरात वाढ झाल्याने, त्याच्या फायदा शेतकऱ्यांना नाही तर व्यापाऱ्यांना अधिक होत असल्याचे बोलले जात आहे.
शेतकऱ्यांपेक्षा व्यापाऱ्यांनाच अधिक फायदा
राज्य पणन महामंडळाच्या आकडेवारीनुसार, या आठवड्याच्या सुरुवातीला अकोला बाजार समितीत तुरीच्या दराने मोठी उसळी घेतली. त्यानुसार तुरीला 13 हजार 800 रुपये प्रति क्विंटलपर्यंतचा दर मिळत आहे. तुलनेने बाजारात आवक कमी असल्याने तुरीच्या दरात वाढ झाल्याचे बोलले जात आहे. मात्र,, सध्याच्या घडीला पावसाळ्याच्या तोंडावर शेतकऱ्यांकडे तूर नसल्याने या भाववाढीचा त्यांना कोणताही फायदा होत नसल्याचे शेतकर्यांकडून सांगितले जात आहे. तर याउलट व्यापाऱ्यांनी मात्र ऐन हंगामात तुरीचा साठा करून, भाववाढीच्या या लाटेत व्यापारी चांगलेच हात धुवून घेत असल्याचे पाहायला मिळत आहे.
[read_also content=”‘या’ दिवशी मिळणार पीएम किसान योजनेचा 17 वा हप्ता; 20,000 कोटी होणार वितरित! https://www.navarashtra.com/business/17th-installment-of-pm-kisan-yojana-will-be-distributed-on-june-18-547406.html”]
संपूर्ण हंगामात दर चढेच
दरम्यान, मागील संपूर्ण हंगामात तुरीचे दर चढेच असल्याचे पाहायला मिळाले आहे. हंगामाच्या सुरुवातीला ८००० ते ९००० रूपये प्रति क्विंटल असणारे तुरीचे दर, हंगामाच्या मध्यावधीत काही काळ १०००० ते १०५०० रुपये प्रति क्विंटलच्या आसपास स्थिरावलेले होते. मात्र, आता शेतकऱ्यांकडील तूर संपल्याने आणि बाजारात तुलनेने तुरीची कमी आवक असल्याने तूर दराने थेट 13 हजार 800 रुपये प्रति क्विंटलपर्यंत पल्ला गाठला आहे. यावर्षी केंद्र सरकारने तुरीला 7000 रूपये किमान आधारभूत किंमत निश्चित केली आहे. मात्र, सध्या हमीभावापेक्षा तुरीला ज्यादा दर मिळत आहे.
या आठवड्यातील अकोला बाजार समितीतील तुरीचे दर
१० जून – 13800 प्रति क्विंटल
११ जून – 12500 प्रति क्विंटल
१२ जून – 12650 प्रति क्विंटल
१३ जून – 12500 प्रति क्विंटल