कोण म्हणतं मराठी माणसाला बिझनेस जमत नाही! अकोल्याहून आलेल्या पठ्ठयाने बांधकाम क्षेत्रात गाजवले 'सुपर्ब' नाव (फोटो सौजन्य - सोशल मीडिया)
Sugat Waghmare Marathi News: मुंबईतील बांधकाम व्यवसाय सध्या वेगाने वाढत आहे. शहरातील वाढती लोकसंख्या, व्यापारी केंद्रांची गरज, तसेच अधुनिकीकरणाची मागणी यामुळे नवीन इमारतींचे आणि गगनचुंबी टॉवरचे काम जोमात सुरू आहे. मुंबईचे बांधकाम क्षेत्र हे रोजगारनिर्मितीचे मोठे साधन म्हणून नावारूपास येत आहे.
मुंबईसारख्या महानगरात बांधकाम क्षेत्रामध्ये सध्या प्रचंड स्पर्धा वाढली आहे. अनेक मोठ्या व लघु बिल्डर्स, रिअल इस्टेट कंपन्या आणि विकासकांनी या क्षेत्रात आपले पाय रोवले असून, नवीन प्रकल्प, आकर्षक योजना आणि परवडणाऱ्या किमतींच्या माध्यमातून ग्राहकांना आपल्याकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न सुरू आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, जलद काम पूर्ण करण्याची क्षमता, आणि हिरव्या व शाश्वत इमारतींची मागणी यामुळे स्पर्धा अधिक तीव्र झाली आहे.
या स्पर्धेमुळे ग्राहकांना जरी अधिक पर्याय मिळत असले, तरी अनेक वेळा गुणवत्तेच्या बाबतीत तडजोड होण्याचा धोका असतो. शिवाय, कमी दरात प्रकल्प पूर्ण करण्याच्या स्पर्धेमुळे कामगारांची सुरक्षितता आणि इमारतींच्या टिकाऊपणावरही प्रश्नचिन्ह निर्माण होते. या स्पर्धेतही उद्योजक डॉ. सुगत वाघमारे बांधकाम क्षेत्र जबाबदारीने व पारदर्शकतेने हाताळत, या क्षेत्रात आपली ओळख निर्माण केली आहे.
मूळचे अकोला जिल्ह्यातील असलेले सुगत वाघमारे यांचा प्रवास प्रेरणादायी आहे. सन १९८२, अकोल्यामधे डॉ. सुगत वाघमारे यांचे वडील ज्ञानेश्वर वाघमारे यांनी बांधकाम व्यवसाय सुरू केला. पॉलिटेक्निकमध्ये सिव्हिल इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण होताच सुगत वाघमारे यांनी १९९१ मध्ये वडिलांच्या व्यवसायात पदार्पण केले. काही वर्ष अनुभव घेतल्यानंतर सुगत वाघमारे यांनी तीक्ष्णगत बिल्डर्स सुरु केले. या कंपनी अंतर्गत त्यांनी अकोल्यातील अनेक प्रकल्प पुर्ण केले. अकोल्यात चांगला जम बसल्यावर त्यांनी २००५ मधे मुंबईत कन्स्ट्रक्शन क्षेत्रात पाऊल ठेवलं.
सुगत वाघमारे यांना मुंबईमध्ये बांधकामासंबंधी एक संधी मिळाली. २००५ मध्ये सुगत मुंबईला आले. एका वर्षांत प्रचंड मेहनत करून मुंबईतही आपल्या कार्याचा ठसा उमटवला. आकोल्यासह मुंबईतल्या मुलुंड, पवई, पनवेलसह अनेक ठिकाणी इमारती उभारल्या. औरंगाबादमध्ये तर ३०० घरांची एक मोठी वसाहत उभारली.
सध्या पनवेलमध्ये तीन हजार घरांचा मोठा प्रकल्प सुगत यांची कंपनी उभारत आहे. यातील १५०० घरे ही आयुर्विमा महामंडळ आणि उर्वरित १५०० घरे मुंबई महानगरपालिकेच्या कर्मचार्यांसाठी नियोजित आहेत. यासोबतच पनवेल मध्ये आणखी दोन प्रकल्पांची पायाभरणी सुरू आहे. आपल्या उद्योगाच्या माध्यमातून प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष ते शेकडो कामगारांना रोजगार देत आहेत.
सोबतच सामाजिक भान जपत त्यांची तिक्ष्णगत मल्टीपर्पज वेल्फेअर सोसायटी गेल्या कित्येक वर्षांपासून बालकांचे सौरक्षण व कल्याण, युवकांना रोजगार मार्गदर्शन,
उद्योगांविषयी मार्गदर्शन, महिलांना तथा आर्थिक दुर्बल घटकांना सक्षम बनविण्याकरिता कार्यरत आहे. समाजातील शेवटच्या घटकापर्यंत शिक्षण व रोजगार पोहोचावा याकरीता ते सतत प्रयत्नशील असतात. आपण या देशाचे नागरिक आहोत आणि या नात्याने आपल या देशाला, समाजाला काहितरी देणं लागत ही भावना आपल इति कर्तव्य मानत त्यांचं सामाजिक कार्य अव्याहतपणे सुरू आहे.
प्रो. प्रा. सुपर्ब कन्स्ट्रक्शन, चेअरमन सुपर्ब हाउसिंग एंड इंफ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड, मॅनेजिंग डायरेक्टर सुपर्ब माँ इंफ्रा अँड हाउसिंग LLP, चेअरमन सुपर्व माँ डेव्हलपर्स LLP अशी विविध पदे भूषवित असलेले डॉ. सुगत वाघमारे यांना विविध पदांसह त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. यामध्ये कार्पोरेट एक्सिलेंस अंतर्गत रियलईस्टेटमध्ये एक्सीलेंस वर्क इन रेसीडेन्सियल प्रोजेक्टस, समाज भूषण पुरस्कार, आंबेडकर युवा परिषद पुरस्कार, वेद वासुदेव प्रतिष्ठान मानद पुरस्कार, डायनामिक पर्सनैलिटी ऑफ द इयर पुरस्कार, विदर्भ रत्न पुरस्कार, उद्योग रत्न पुरस्कारांचा समावेश आहे.
याशिवाय अमेरिकेतील जॉर्डन रिव्हर विद्यापीठाने जून २०२३ मध्ये सुगत वाघमारे याना डि.लिट ही मानद पदवी देऊन सन्मानित केले आहे. अल्पावधीतच यशाचे शिखर गाठलेले वाघमारे यांची नाळ अजूनही मातीशी जुळलेली आहे. आपल्या सोबत काम करणारे सहकारी व परिवार हेच आपल्या यशाचे कारण असल्याचे डॉ. सुगत वाघमारे सांगतात.