फोटो सौजन्य - Social Media
गडचिरोली जिल्ह्यातील 100 अंगणवाड्यांचं रूपांतर ‘नंदघर’ या आधुनिक सुविधांनी सुसज्ज केंद्रात करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून साकारत असलेल्या या उपक्रमामुळे आदिवासी आणि दुर्गम भागातील महिला व बालकांच्या विकासाला नवी दिशा मिळणार आहे. या प्रकल्पाअंतर्गत प्रत्येक नंदघरात सकाळच्या सत्रात 3 ते 6 वयोगटातील बालकांना ई-लर्निंगच्या माध्यमातून शिक्षण, पोषण आहार व आरोग्यसेवा दिली जाणार आहे. दुपारी मात्र, महिलांसाठी आरोग्य जनजागृती, सूक्ष्म उद्योजकता प्रशिक्षण आणि किशोरींसाठी उद्योगपूरक कौशल्य विकास कार्यक्रम राबविण्यात येणार आहेत.
महिला व बालविकास विभाग, जिल्हा परिषद गडचिरोली आणि वेदांत ग्रुपच्या अनिल अग्रवाल फाउंडेशन यांच्यात यासाठी सामंजस्य करार करण्यात आला आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे आणि नंदघरचे मुख्य कार्यकारी अधिकारी शशी अरोरा यांच्या हस्ते करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या आहेत.
या उपक्रमात एकूण 3,867 बालके, 602 गरोदर व स्तनदा माता आणि 1,134 किशोरींना लाभ मिळणार आहे. आधुनिक अंगणवाड्यांमध्ये एलईडी टीव्ही, टॅबलेट, रंगीत सजावट, स्वच्छ पाणी, स्वच्छतागृह, आरोग्य तपासणीसाठी सुविधा आणि सौरऊर्जा आधारित वीजपुरवठा पुरवण्यात येईल. यासोबतच अंगणवाडी सेविका, आशा वर्कर्स आणि एएनएम यांना आवश्यक प्रशिक्षणही दिलं जाईल. जिल्हा परिषद या उपक्रमाची अंमलबजावणी करणारी समन्वयक संस्था असेल. अंगणवाड्यांची यादी तयार करणे, नोडल अधिकारी नेमणे, देखभाल, ब्रँडिंग आणि संयुक्त कार्यगटाच्या माध्यमातून नियमित देखरेख केली जाईल.
राज्य सरकारचा उद्देश हा उपक्रम गडचिरोलीपुरता मर्यादित न ठेवता राज्यभरात राबवण्याचा आहे. ग्रामीण व दुर्गम भागातील लोकांचे जीवनमान उंचावण्यासाठी हा उपक्रम मैलाचा दगड ठरेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.