फोटो सौजन्य - Social Media
NEET PG 2025 साठी तयारी करत आहात? मग या बातमीवर लक्ष द्या. सर्वोच्च न्यायालयाने स्पष्टपणे निणय जाहीर केला आहे की यंदाची NEET PG 2025 परीक्षा एकाच सत्रात घेण्यात येणार आहेत. ही परीक्षा दोन शिफ्टमध्ये घेण्याच्या राष्ट्रीय परीक्षा मंडळाच्या (NBE) निर्णयाला न्यायालयाने नकार दिला आहे. न्यायमूर्ती विक्रम नाथ, संजय कुमार आणि एन. व्ही. अंजारिया यांच्या खंडपीठाने यासंदर्भात निर्णय दिला. दोन सत्रांमध्ये परीक्षा घेण्यात आल्यास विद्यार्थ्यांमध्ये असमानता निर्माण होते, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले.
वेगवेगळ्या सत्रांमध्ये प्रश्नपत्रिकांचा कठीणपणा वेगळा असतो, त्यामुळे सर्व उमेदवारांना समान संधी मिळत नाही. एनबीईने असे सांगितले होते की देशभर एकाच वेळी परीक्षा घेण्यासाठी पुरेशी केंद्रे उपलब्ध नाहीत. मात्र, न्यायालयाने हा युक्तिवाद फेटाळला आणि म्हटले की, देशात पुरेशा तंत्रज्ञानाची उपलब्धता आहे आणि अशा परीक्षा एकाच वेळेस पार पाडणे शक्य आहे.
2024 मध्ये काही विद्यार्थ्यांनी परीक्षा प्रक्रियेतील अपारदर्शकतेवर आक्षेप घेत याचिका दाखल केली होती. त्यावर सुनावणी करताना न्यायालयाने 22 मे रोजी सर्व खासगी आणि डीम्ड वैद्यकीय महाविद्यालयांना त्यांची फी माहिती सार्वजनिक करण्याचे निर्देश दिले होते. याच निर्णयात एकाच सत्रात परीक्षा घेण्यावर भर देण्यात आला. NEET PG 2025 ही परीक्षा 15 जून 2025 रोजी संगणक आधारित पद्धतीने (CBT) पार पडणार आहे. पूर्वी दोन शिफ्टमध्ये परीक्षा होणार होती, मात्र सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशामुळे आता ती फक्त एका सत्रात घेतली जाईल.
टेस्ट सिटी स्लिप 2 जून 2025 रोजी जाहीर करण्यात येणार आहे. तसेच प्रवेशपत्र 11 जून 2025 रोजी जाहीर करण्यात येईल. परीक्षा 15 जून 2025 घेण्यात येणार आहे. तसेच परीक्षेचा निकाल 15 जुलै 2025 पर्यंत जाहीर करण्यात येईल अशी अपेक्षा वर्तवण्यात आली आहे. परीक्षेची वेळ 3 तास 30 मिनिटे असेल. एकूण 200 बहुपर्यायी प्रश्न विचारले जातील. प्रत्येक योग्य उत्तराला 4 गुण दिले जातील, तर चुकीच्या उत्तरासाठी 1 गुण वजा केला जाईल. या निर्णयामुळे अनेक विद्यार्थ्यांनी समाधान व्यक्त केले असून, आता सर्व उमेदवारांना न्याय्य व समान संधी मिळणार आहे.