
फोटो सौजन्य - Social Media
वाशिम जिल्ह्यातील टो जुमडाफाटा येथील श्री मैनागिरी महाराज विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात बारावी परीक्षेदरम्यान उघडकीस आलेल्या सामूहिक कॉपी प्रकरणामुळे शिक्षण क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे. या घटनेत केंद्रप्रमुखासह तब्बल २६ शिक्षकांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून प्रशासनाने कठोर कारवाईचा इशारा दिला आहे.
सोमवारी भौतिकशास्त्राच्या पेपरदरम्यान ५८४ विद्यार्थ्यांनी एकाच प्रकारची उत्तरे लिहिल्याचे समोर आले. जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षणाधिकारी संजय ससाने यांनी केंद्र क्रमांक ०९०६ ला दिलेल्या अचानक भेटीत हा प्रकार उघड झाला. प्रत्येक वर्गातील उत्तरपत्रिका तपासल्यानंतर सर्व विद्यार्थ्यांची उत्तरे अक्षरशः एकसारखी असल्याचे स्पष्ट झाले.
यानंतर ही माहिती तात्काळ जिल्हा परिषद शिक्षणाधिकारी (माध्यमिक) मंगल धुपे आणि जिल्हा दक्षता समिती सदस्य सचिवांना देण्यात आली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्वरित कारवाई करण्यात आली आणि संबंधित सर्व विद्यार्थ्यांचे पेपर तपासून सामूहिक कॉपीचा प्रकार निश्चित करण्यात आला. या घटनेमुळे परीक्षा व्यवस्थेतील गंभीर त्रुटी समोर आल्या असून नियंत्रण यंत्रणेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
या प्रकरणात केंद्र संचालक गजानन कावरखे यांच्यासह पर्यवेक्षक व शिक्षक अशा एकूण २६ जणांचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे संबंधित सर्वांना तात्काळ निलंबित करण्यात आले. त्यानंतर बुधवारी वाशिम ग्रामीण पोलिस ठाण्यात त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी चौकशी सुरू असून संबंधितांची जबाबदारी निश्चित करण्याचे काम वेगाने सुरू आहे.
ही कारवाई महाराष्ट्र गैरव्यवहार प्रतिबंधक कायदा, १९८२ अंतर्गत करण्यात आली असून हा गुन्हा दखलपात्र व अजामीनपात्र आहे. प्रभारी गट शिक्षण अधिकारी गजानन बाजड यांनी या प्रकरणाची अधिकृत फिर्याद नोंदवली आहे. दरम्यान, या घटनेमुळे कॉपीमुक्त परीक्षा मोहिमेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून भविष्यात अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी अधिक कठोर उपाययोजना करण्याची गरज व्यक्त होत आहे.