फोटो सौजन्य - Social Media
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या परीक्षांना आधीच उशीर झालेला असताना, आता प्रत्यक्ष परीक्षा प्रक्रियेतही गंभीर त्रुटी समोर येत आहेत. विद्यापीठाने अलीकडेच परीक्षा व्यवस्थापनाची जबाबदारी नव्या खासगी कंपनीकडे सोपविल्यानंतर संपूर्ण प्रणाली कोलमडल्याचे चित्र दिसून येत आहे. बुधवारी सुरू झालेल्या बी.कॉम. तिसऱ्या सेमिस्टरच्या परीक्षेदरम्यान विद्यार्थ्यांकडून परीक्षा शुल्क न भरताच त्यांना प्रवेशपत्र देण्यात आल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे.
बी.कॉम. तिसऱ्या सेमिस्टरच्या परीक्षा बुधवारी सुरू झाल्या. मात्र परीक्षा व्यवस्थापन करणाऱ्या कंपनीच्या सॉफ्टवेअरमधील तांत्रिक अडचणींमुळे अनेक विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीने परीक्षा शुल्क भरता आले नाही. अर्ज भरूनही शुल्क भरण्याची प्रक्रिया पूर्ण न झाल्याने विद्यार्थ्यांमध्ये मोठी अस्वस्थता निर्माण झाली होती. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, या उद्देशाने विद्यापीठ प्रशासनाने तात्पुरता उपाय म्हणून सर्व विद्यार्थ्यांना प्रवेशपत्र देत परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला.
मात्र, शुल्क न भरता परीक्षा दिल्यामुळे पुढील टप्प्यांबाबत — विशेषतः निकाल जाहीर होणे, पुढील सत्रात प्रवेश मिळणे यासंदर्भात अनिश्चितता निर्माण झाली आहे. या निर्णयामुळे भविष्यात कायदेशीर व प्रशासकीय अडचणी उद्भवण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
याशिवाय, प्रवेशपत्रांमध्येही मोठ्या प्रमाणावर त्रुटी आढळून आल्या. बी.कॉम. तिसऱ्या सेमिस्टरला एकूण आठ विषय असताना अनेक विद्यार्थ्यांच्या प्रवेशपत्रांवर अपूर्ण किंवा चुकीची विषय नोंद करण्यात आली होती. याबाबत विद्यार्थ्यांनी तातडीने तक्रारी केल्यानंतर परीक्षा केंद्रांवर तात्पुरत्या स्वरूपात दुरुस्ती करून परीक्षा घेण्यात आल्या. मात्र हा प्रकार विद्यापीठाच्या ढिसाळ व्यवस्थापनावर गंभीर प्रश्न उपस्थित करणारा ठरला आहे.
नागपूर विद्यापीठाने अलीकडेच ‘कोएम्प्ट’ या नव्या कंपनीकडे परीक्षा राबविण्याचे काम सोपविले आहे. मात्र या बदलानंतर विविध अभ्यासक्रमांच्या परीक्षा प्रक्रियेत सातत्याने गोंधळ होत असल्याचे समोर येत आहे. बी.कॉम. तिसऱ्या सेमिस्टरच्या परीक्षा २४ डिसेंबरपासून सुरू होणार होत्या. त्यानुसार महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांकडून परीक्षा अर्ज भरून घेतले होते. परंतु कंपनीच्या सॉफ्टवेअरमधील गंभीर त्रुटींमुळे हे अर्ज विद्यापीठाकडे योग्य पद्धतीने सबमिटच झाले नसल्याची माहिती आहे. विद्यार्थ्यांच्या डेटामध्ये मोठ्या प्रमाणावर गोंधळ झाल्याने शुल्क निश्चित करणेही कंपनीला शक्य झाले नाही.
हा प्रकार केवळ बी.कॉम.पुरताच मर्यादित नसून, इतर अभ्यासक्रमांबाबतही अशीच परिस्थिती असल्याचे सांगण्यात येत आहे. विशेषतः इंजिनीअरिंगसारख्या अभ्यासक्रमांच्या परीक्षा, निकाल व पुढील सत्राची प्रवेश प्रक्रिया कशी राबविली जाणार, याबाबत अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.
यासंदर्भात प्रतिक्रिया देताना विद्यापीठ सिनेट सदस्य चेतन मसराम यांनी सांगितले की, “शिकवण, परीक्षा आणि निकाल हा शैक्षणिक सत्राचा कणा आहे. या प्रक्रियांना सर्वोच्च प्राधान्य देणे गरजेचे आहे. जर काम नीट झाले नाही, तर डेटाची सुरक्षित प्रत गोपनीय स्वरूपात उपलब्ध असणे अत्यंत आवश्यक आहे.” विद्यापीठ प्रशासनाने या संपूर्ण प्रकरणाची तातडीने दखल घेऊन परीक्षा व्यवस्थापनातील त्रुटी दूर कराव्यात, अशी मागणी विद्यार्थी व शिक्षणतज्ज्ञांकडून होत आहे.






