फोटो सौजन्य - Social Media
बीड जिल्ह्यातील आष्टी येथील अनुष्का आणि तनुष्का देशपांडे या जुळ्या बहिणींनी यंदाच्या दहावीच्या परीक्षेत मिळवलेल्या यशाची सध्या सगळीकडे चर्चा सुरू आहे. या दोघींनी एकसारखे म्हणजेच सेम टू सेम गुण मिळवत 96% टक्के गुणांची कमाई केली आहे. हे विशेष म्हणजे त्या दोघी जुळ्या असूनही केवळ दिसण्यात नव्हे, तर अभ्यासातही एकसारख्या यशस्वी ठरल्या आहेत.
धीरज देशपांडे यांच्या या जुळ्या मुली आहेत. शाळेपासूनच दोघी एकत्रच होत्या. शाळेत जाणं, अभ्यास करणं, प्रश्न विचारणं, एकमेकींच्या शंका सोडवणं हे सर्व त्या दोघी मिळून करत असत. परीक्षेपूर्वी त्यांनी एकत्र अभ्यास केला होता, पण निकाल एकसारखाच लागेल, अशी कल्पनाही त्यांनी केली नव्हती. निकाल पाहिल्यावर दोघींनाही खूप आनंद झाला. दोघींच्या चेहऱ्यावर हसणे पाहून घरात आल्हाददायी वातावरण तयार झाले.
अनुष्का हिने सांगितले की, “आम्ही एकत्र अभ्यास करत होतो. एकमेकींच्या शंका सोडवत होतो. त्यामुळेच आम्हाला हे यश मिळालं.” तनुष्काही तिला दुजोरा देत म्हणाली की, “स्पर्धा नव्हती, पण एकमेकांना मदत करत गेलो म्हणून चांगले गुण मिळाले.” यामध्ये आई-वडिलांची साथसुद्धा त्यांना मोलाची ठरली. निकाल लागल्यानंतर आई-वडिलांनी औक्षण करून दोघींनाही आशीर्वाद दिला आणि त्यांचे यश साजरे केले.
फक्त अभ्यासातच नव्हे तर या दोघींना नृत्याचीही आवड आहे. विशेष म्हणजे त्या दोघी एकत्र नृत्य करताना हुबेहूब एकसारखं नृत्य करतात, त्यामुळे पाहणाऱ्यांनाही आश्चर्य वाटतं. जणू काही आरशातच एकमेकांचं प्रतिबिंब आहे, असं भासतं.
या दोघींचं हे यश म्हणजे कष्ट, समर्पण आणि एकमेकांची साथ या गोष्टींनी मिळवलेलं फळ आहे. त्यांच्या या यशामुळे आष्टी शहरात आणि शाळेतही त्यांचं कौतुक होत आहे. जुळ्या बहिणींनी जुळे गुण मिळवले, ही बाब साऱ्यांचं लक्ष वेधून घेणारी आहे. पुढील शिक्षणातही त्या दोघींना यश मिळो, हीच सर्वांची शुभेच्छा!