
ca and cs
CA and CS Job Market India: भारताच्या कॅम्पस जॉब मार्केटमध्ये चार्टर्ड अकाउंटंट्स (CA) आणि कंपनी सेक्रेटरी (CS) या प्रोफेशनल्सची मागणी वेगाने वाढत असल्याचे समोर आले आहे. एओएन (AON) च्या कॅम्पस स्टडी रिपोर्ट २०२६-२७ नुसार, अभियांत्रिकी (इंजिनिअरिंग) आणि एमबीए (MBA) सारख्या व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या तुलनेत कंपन्यांचा ओघ आता सीए आणि सीएस उमेदवारांच्या भरतीकडे अधिक असल्याचे दिसत आहे.
रिपोर्टनुसार, ५६ टक्के कंपन्या आगामी काळात सीए आणि सीएस प्रोफेशनल्सची भरती वाढवण्याची तयारी करत आहेत. ३३ टक्के संस्थांच्या भरती प्रक्रियेत कोणताही बदल होणार नाही, तर केवळ ११ टक्के कंपन्यांनी ही भरती कमी करण्याची योजना आखली आहे. यावरून सीए आणि सीएससाठी नेट हायरिंग इंटेंट (Net Hiring Intent) +४५ टक्के इतके सर्वाधिक नोंदवले गेले आहे.
सीए-सीएसच्या तुलनेत इंजिनिअरिंग आणि एमबीए उमेदवारांबाबत कंपन्यांची भूमिका संमिश्र व मंदीची राहिली आहे. इंजिनिअरिंगसाठी नेट हायरिंग इंटेंट -४ अंक, तर एमबीएसाठी हे प्रमाण -१० अंक इतके खाली आले आहे. ३६ टक्के कंपन्या इंजिनिअरिंगची भरती वाढवू इच्छित आहेत, तर ४० टक्के ते कमी करू पाहत आहेत. एमबीएच्या बाबतीत ३४ टक्के कंपन्या भरती वाढवण्याच्या बाजूने तर ४४ टक्के कमी करण्याच्या विचारात आहेत.
NEET UG Scam : नीट परीक्षा वादावर सर्वात मोठी अपडेट; मास्टरमाइंड्सचे चेहरे लवकरच उघड होणार?
सीए आणि सीएसची मागणी केवळ पूर्णवेळ नोकऱ्यांपुरती मर्यादित नसून ९१ टक्के संस्था सीए-सीएस इंटर्नना कामावर घेतात. याशिवाय, सुमारे ८२ टक्के कंपन्या सीए आणि सीएस इंटर्नना थेट प्री-प्लेसमेंट मुलाखत किंवा ऑफर (PPO) प्रदान करतात.
एकीकडे कंपन्यांमध्ये सीए-सीएसची मागणी वाढत असताना, दुसरीकडे मागील काही वर्षांत सीए फायनल परीक्षा देणाऱ्या उमेदवारांच्या संख्येत घट झाली आहे. मे २०१७ मध्ये १,३२,००७ रजिस्ट्रेशन झाले होते, जे मे २०२५ मध्ये घसरून ९९,४६६ वर आले. तसेच सप्टेंबर २०२५ च्या परीक्षेत हे प्रमाण ८१,८५२ नोंदवले गेले, जे २०१७ च्या तुलनेत सुमारे ३८ टक्क्यांनी कमी आहे.
एकूण रजिस्ट्रेशनची संख्या काहीशी कमी झाली असली, तरी सीए फायनल परीक्षांमध्ये महिलांच्या सहभागात मोठी वाढ झाली आहे. मे २०१५ मध्ये महिलांची हिस्सेदारी ३५ टक्के होती, जी वाढून मे आणि सप्टेंबर २०२५ मध्ये जवळपास ४१ टक्क्यांवर पोहोचली आहे.