
फोटो सौजन्य - Social Media
या पार्श्वभूमीवर उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी राज्यातील सर्व अकृषी विद्यापीठांच्या कुलगुरूंसोबत चर्चा केली. भरती प्रक्रियेतील वस्तुस्थिती आणि प्रत्यक्षातील समस्या जाणून घेतल्यानंतर त्यांनी अध्यादेशातील वादग्रस्त निकष तात्काळ बदलण्याचे आदेश दिले. सध्या सुधारित अध्यादेशाला अंतिम रूप देऊन तो मंजुरीसाठी राज्यपाल कार्यालयाकडे पाठवण्यात आला असल्याची माहिती उच्च शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.
नव्या अध्यादेशात काही तरतुदी अशा होत्या, ज्यामुळे NET/SET उत्तीर्ण उमेदवारांना प्राध्यापक पदासाठी अर्ज करण्यासाठी आवश्यक पात्रता गुण कमी पडण्याची शक्यता होती. राज्यातील उमेदवारांना मागे टाकत परराज्यातील उमेदवार अधिक प्रमाणात पात्र ठरतात, अशी भीती निर्माण झाली. विशेषतः, काही विषयांमध्ये पात्र उमेदवारच उपलब्ध होणार नाहीत, अशी परिस्थिती निर्माण होऊ शकते, असे अनेक तज्ज्ञांनी निदर्शनास आणून दिले.
५०:५० सूत्र परत येण्याची चिन्हे
प्राध्यापक भरतीसाठी लागू असलेले नवीन ७५:२५ गुणांकन सूत्र (शैक्षणिक पात्रता – ७५ गुण, मुलाखत – २५ गुण) अनेक उमेदवारांना अडचणीत आणणारे ठरले. या सूत्रामुळे NET/SET उत्तीर्ण उमेदवारांना अपेक्षित गुण मिळण्यात अडथळे येत होते. त्यामुळे यावर पर्याय म्हणून पूर्वी लागू असलेले ५०:५० सूत्र पुन्हा लागू करण्याची शक्यता उच्चशिक्षण विभागाने व्यक्त केली आहे. हे सूत्र लागू झाल्यास राज्यातील उमेदवारांना अधिक संधी मिळेल आणि गुणवत्ता व अनुभव या दोन्ही घटकांना संतुलित महत्त्व मिळू शकते.