फोटो सौजन्य - Social Media
राज्यभरातील विद्यार्थ्यांसाठी एक प्रतिष्ठित आणि महत्त्वाचं शैक्षणिक केंद्र म्हणजे मुंबई विद्यापीठ! मुळात, मुंबई विद्यापीठ सध्या नवीन शैक्षणिक वर्षासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू करत आहे. मात्र, याच संधीचा गैरफायदा घेत काही समाजकंटकांनी विद्यापीठाच्या नावाचा गैरवापर करत विद्यार्थ्यांची फसवणूक करण्याचा प्रयत्न केला आहे. एका बनावट फेसबुक पेजद्वारे ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेच्या नावाखाली विद्यार्थ्यांकडून वैयक्तिक माहिती मागवली जात आहे. या प्रकारामुळे आर्थिक फसवणुकीची भीती निर्माण झाली असून, याबाबत सायबर क्राइम विभागाकडे अधिकृत तक्रार दाखल करण्यात आली आहे.
खालील मुद्द्यांद्वारे सदर फसवणुकीचा प्रकार स्पष्ट केला आहे:
मुंबई विद्यापीठातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे की, विद्यापीठाच्या किंवा त्याच्या वतीने अशा कोणत्याही फेसबुक पेजद्वारे अधिकृत प्रवेश प्रक्रिया राबवली जात नाही. विद्यापीठाने नागरिकांना अशा बनावट पेजपासून दूर राहण्याचे आणि अशी कुठलीही संशयास्पद माहिती मिळाल्यास तत्काळ सायबर विभाग किंवा विद्यापीठ प्रशासनाला कळवण्याचे आवाहन केले आहे. विद्यार्थ्यांनी आपली वैयक्तिक माहिती, विशेषतः आर्थिक माहिती, अनधिकृत संकेतस्थळांवर देऊ नये.
सध्या ऑनलाईन फसवणुकीच्या प्रकारांमध्ये लक्षणीय वाढ झाल्याने सायबर क्राइम विभागाकडून सातत्याने कारवाई केली जात असून, जनजागृतीसाठी प्रयत्न सुरू आहेत. प्रवेश प्रक्रियेची अधिकृत आणि सविस्तर माहिती मुंबई विद्यापीठाच्या www.mu.ac.in या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून दिली जाणार आहे. याशिवाय, विद्यापीठाच्या अधिकृत सोशल मीडिया हँडल्स द्वारेही विद्यार्थ्यांपर्यंत खात्रीशीर माहिती पोहोचवली जाईल. त्यामुळे पालक आणि विद्यार्थ्यांनी फसवणूक टाळण्यासाठी अधिकृत माध्यमांवरच विश्वास ठेवावा.