फोटो सौजन्य - Social Media
राज्यातील इतर मागास प्रवर्ग (OBC), विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्गातील उच्च शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी वर्ष २०२५-२६ साठी वसतिगृह प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. ही प्रवेश प्रक्रिया ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना आणि पंडित दिनदयाल उपाध्याय स्वयंम योजना अंतर्गत राबवली जाणार आहे. यासंदर्भातील माहिती इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे अवर सचिव आ. सु. जोगळेकर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली.
या योजनांचा उद्देश सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणात संधी उपलब्ध करून देणे आणि त्यांना निवासाची सुविधा पुरवून शैक्षणिक अडचणी कमी करणे हा आहे. बारावीनंतरच्या अभ्यासक्रमांमध्ये म्हणजेच बी.ए., बी.कॉम., बी.एस.सी. तसेच पदवीनंतरचे एम.ए., एम.एस.सी. यासारखे पदव्युत्तर अभ्यासक्रम (व्यावसायिक अभ्यासक्रम वगळून) शिकणारे विद्यार्थी या वसतिगृह प्रवेशासाठी पात्र आहेत.
विद्यार्थ्यांनी वसतिगृह प्रवेशासाठी ११ ऑगस्ट २०२५ पर्यंत ऑनलाइन अर्ज सादर करणे आवश्यक आहे. त्यानंतर १२ ते १७ ऑगस्ट २०२५ या कालावधीत अर्जांची छाननी करण्यात येईल. १८ ऑगस्ट २०२५ रोजी गुणवत्तेनुसार पहिली निवड यादी प्रसिद्ध करण्यात येईल. या यादीत नाव आलेल्या विद्यार्थ्यांना वसतिगृहात प्रवेश घेण्यासाठी १ सप्टेंबर २०२५ ही अंतिम मुदत राहणार आहे.
जर पहिल्या टप्प्यात काही जागा रिक्त राहिल्यास, २ सप्टेंबर २०२५ रोजी दुसरी निवड यादी जाहीर करण्यात येईल. या दुसऱ्या यादीत नाव असलेल्या विद्यार्थ्यांसाठी १२ सप्टेंबर २०२५ पर्यंत वसतिगृह प्रवेश घेण्याची अंतिम मुदत देण्यात आली आहे. ही प्रवेश प्रक्रिया पारदर्शक आणि गुणवत्ताधारित असून, विद्यार्थ्यांनी वेळापत्रकानुसार सर्व आवश्यक कागदपत्रांसह अर्ज सादर करावेत. ही योजना आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि मागासवर्गीय विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी सक्षम करण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे.