फोटो सौजन्य - Social Media
UPSC सिव्हिल सेवा परीक्षा ही देशातील सर्वात कठीण आणि प्रतिष्ठेची परीक्षा मानली जाते. लाखो विद्यार्थी दरवर्षी तयारी करतात, पण यश केवळ काही जणांच्या वाट्याला येते. या परीक्षेत पहिल्याच प्रयत्नात यश मिळवणं म्हणजे एक मोठं स्वप्न जिंकणं असतं. असंच स्वप्न साकार केलं IAS सृष्टी जयंत देशमुख यांनी. सृष्टी जयंत देशमुख यांचा जन्म २८ मार्च १९९६ रोजी मध्यप्रदेशच्या भोपाळ शहरात झाला. त्यांचे वडील जयंत देशमुख हे एका खासगी कंपनीत इंजिनिअर असून आई सुनिता देशमुख या खासगी शाळेत शिक्षिका आहेत. सृष्टीने तिचं शालेय शिक्षण भोपाळमधील कार्मेल कॉन्व्हेंट शाळेत पूर्ण केलं. दहावीत तिने 10 CGPA मिळवले आणि बारावीत 93% गुण मिळवून उत्तुंग यश मिळवलं.
सृष्टीने पुढे भोपाळच्या लक्ष्मी नारायण कॉलेज ऑफ टेक्नॉलॉजीमधून केमिकल इंजिनिअरिंग पूर्ण केलं. मात्र, इंजिनिअरिंगमध्ये फारसा रस न वाटल्याने तिने पदवी पूर्ण झाल्यानंतर UPSC सिव्हिल सेवा परीक्षेची तयारी करण्याचा निर्णय घेतला.
तिची तयारी अत्यंत शिस्तबद्ध आणि रणनीतीपूर्वक होती. तिने कोणतेही मोठे क्लासेस न करता सेल्फ स्टडीवर भर दिला. दररोज वर्तमानपत्र वाचणे, माहितीपूर्ण टीव्ही कार्यक्रम पाहणे आणि सातत्यपूर्ण अभ्यास यावर ती विश्वास ठेवत होती. अभ्यासासाठी दिवसाचे अनेक तास ती खर्च करत असे. तिच्या या प्रवासात तिच्या आईवडिलांनीही खूप मोठा आधार दिला. या मेहनतीचे फल म्हणून तिने 2018 मध्ये पहिल्याच प्रयत्नात UPSC परीक्षा उत्तीर्ण केली आणि देशात 5 वी रँक मिळवली. ती तिच्या बॅचची महिला टॉपर ठरली आणि IAS सेवेसाठी तिची निवड झाली.
त्यानंतर, सृष्टीची पोस्टिंगपूर्व प्रशिक्षण LBSNAA, मसूरी येथे झाले. तिथे तिची ओळख तिच्याच बॅचमेट IAS डॉ. नागार्जुन बी. गौडा यांच्याशी झाली. ओळख वाढली आणि नातं प्रेमात बदललं. 2022 मध्ये त्यांनी विवाह केला. सृष्टी जयंत देशमुख यांची ही प्रेरणादायी कहाणी दाखवते की, जर आत्मविश्वास, संयम आणि मेहनत असेल, तर यश नक्कीच मिळते. तेही पहिल्याच प्रयत्नात!