
फोटो सौजन्य - Social Media
लोकशाही व्यवस्थेत राजकारण हे केवळ सत्तेचे साधन नसून समाज घडवण्याचे प्रभावी माध्यम आहे. त्यामुळे अनेकदा प्रश्न उपस्थित होतो की, राजकारणी होण्यासाठी शिक्षित असणं खरंच गरजेचं आहे का? आजवरचा राजकीय इतिहास पाहिला तर उत्तर थोडंसं मिश्र आहे. पूर्वीच्या काळात राजकारणात शिक्षणाला फारसं महत्त्व दिलं जात नव्हतं. समाजातील प्रश्न, लोकांच्या अडचणी आणि जमिनीवरचं वास्तव समजणारा माणूस नेता होऊ शकत होता. त्यामुळे शिक्षित असो वा अशिक्षित, दोघांनाही राजकारणात संधी मिळत होती. मात्र, काळ बदलला आहे. आज राजकारण ही केवळ सभा, भाषण आणि आंदोलनांपुरती मर्यादित गोष्ट राहिलेली नाही, तर धोरणे, कायदे, अर्थकारण, प्रशासन आणि आंतरराष्ट्रीय घडामोडी यांच्याशी थेट जोडलेली आहे.
आजच्या स्पर्धात्मक युगात जवळजवळ प्रत्येक क्षेत्रात शिक्षणाला महत्त्व आले आहे. नागरिक, कार्यकर्ते, अधिकारी हे सर्वच मोठ्या प्रमाणात शिक्षित झाले आहेत. अशा परिस्थितीत जर नेता अशिक्षित किंवा कमी शिक्षित असेल, तर “सगळे शिक्षित आणि नेता अडाणी” हे समीकरण अनेकांना खटकते. त्यामुळे आधुनिक काळात राजकारणात शिक्षणाचे महत्त्व नक्कीच वाढले आहे.
अशिक्षित किंवा कमी शिक्षण असूनही उंचशिखर गाठलेले महाराष्ट्रातील लोकनेते
महाराष्ट्राच्या राजकारणात असे अनेक नेते होऊन गेले, ज्यांचे औपचारिक शिक्षण मर्यादित होते, पण अनुभव, नेतृत्वगुण आणि जनसंपर्काच्या जोरावर त्यांनी मोठी उंची गाठली. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे शिक्षण दहावीपर्यंतच होते. मात्र त्यांची भाषाशैली, विचारांची धार आणि जनमानसावर असलेला प्रभाव आजही आदर्श मानला जातो. तसेच अजित पवार यांचे शिक्षणही मर्यादित असले, तरी प्रशासनावर पकड, निर्णयक्षमता आणि राजकीय अनुभवामुळे त्यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात मोठं स्थान निर्माण केलं. केवळ दहावी किंवा बारावी शिक्षण असतानाही काही नेत्यांनी राजकारणात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. अशा नेत्यांनी लोकांच्या प्रश्नांशी थेट नातं जोडलं, जमिनीवर काम केलं आणि अनुभवातून शिकत स्वतःला घडवलं. हे उदाहरण दाखवतात की शिक्षण कमी असलं तरी राजकारणात यश अशक्य नाही.
उच्चशिक्षित लोकनेते
दुसरीकडे, यशवंतराव चव्हाण, विलासराव देशमुख, प्रमोद महाजन, आर. आर. पाटील यांसारखे उच्चशिक्षित नेतेही महाराष्ट्राने पाहिले आहेत. कायदा, अर्थशास्त्र, विज्ञान, राज्यशास्त्र यांसारख्या विषयांचं ज्ञान त्यांच्या निर्णयांमध्ये आणि धोरणांमध्ये स्पष्टपणे दिसून येतं. आधुनिक प्रशासन, कायदे आणि जागतिक स्तरावरील आव्हानं समजून घेण्यासाठी हे शिक्षण उपयुक्त ठरतं.
शिक्षण हे राजकारणात यशाचं एकमेव सूत्र नाही, पण आजच्या काळात ते दुर्लक्षितही करता येणार नाही. अनुभव, नेतृत्व, लोकांशी नातं आणि नैतिकता यासोबत शिक्षणाची जोड मिळाली, तर तो नेता अधिक प्रभावी ठरतो. म्हणूनच आजच्या राजकारणात शिक्षण आवश्यक नसले तरी अत्यंत महत्त्वाचे झाले आहे, असे म्हणणे वावगे ठरणार नाही.