फोटो सौजन्य - Social Media
काही व्यक्तींच्या जीवनकथा अशा असतात की त्या वाचल्यानंतर नक्कीच वाटतं, “हिम्मत असेल तर अशक्य काहीच नाही.” केरळमधील मुन्नार येथील श्रीनाथ के. यांची युपीएससी परीक्षेतील यशोगाथा हेच दाखवून देते. गरिबी, संघर्ष आणि अपुऱ्या साधनांमधूनही त्यांनी आयएएस अधिकारी बनण्याचं स्वप्न सत्यात उतरवलं. विशेष बाब म्हणजे त्यांनी हे शिक्षण फुकटच्या Wi-Fi सुविधेवर मिळवलेल्या ज्ञानाच्या आधारावर पूर्ण केलं. श्रीनाथ हे एर्नाकुलम रेल्वे स्थानकावर कुली म्हणून काम करत होते. दिवसाला ४००-५०० रुपये मिळायचे. त्याच कमाईवर घर चालवायचं होतं. कोणतीही महागडी कोचिंग क्लासेस नाहीत, ना महागड्या पुस्तके. पण युपीएससीच्या स्वप्नाप्रती असलेली त्यांची जिद्द कोणत्याही अडचणींपुढे कमी पडली नाही.
२०१६ साली रेलटेल आणि गूगलने भारतातील अनेक रेल्वे स्थानकांवर मोफत Wi-Fi सेवा सुरू केली. मुंबई सेंट्रल स्थानकावर काम करत असताना श्रीनाथ यांनी या सुविधेचा पुरेपूर उपयोग केला. त्यांनी स्मार्टफोन आणि हेडफोन घेऊन इंटरनेटवरून ऑडिओ बुक्स, लेक्चर्स, आणि अभ्याससामग्री डाउनलोड करून अभ्यास सुरू ठेवला. काम करताना, विश्रांतीत किंवा रात्री उशिरा वेळ मिळेल तिथे आणि कधीही ते अभ्यास करत होते.
२७ व्या वर्षी त्यांनी स्पर्धा परीक्षांची तयारी सुरू केली. प्रथम त्यांनी केरल लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण केली आणि सरकारी नोकरी मिळवली. पण त्यांना तिथे थांबायचं नव्हतं. अनेक प्रयत्नांनंतर शेवटी चौथ्या प्रयत्नात त्यांनी UPSC परीक्षा यशस्वीरित्या उत्तीर्ण केली आणि आयएएस अधिकारी बनले.
२०१८ साली केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी ट्विटरवरून श्रीनाथ यांचे कौतुक केले. त्यांच्या या यशाची दखल गूगल इंडियानेही घेतली. श्रीनाथ यांची ही कथा शिकवते की यश मिळवण्यासाठी महागड्या साधनांची नव्हे, तर अपार मेहनत, चिकाटी आणि समर्पणाची गरज असते. आज ते हजारो विद्यार्थ्यांसाठी प्रेरणास्रोत बनले आहेत. एक असा माणूस ज्याने रेल्वे स्थानकावर काम करताना डिजिटल तंत्रज्ञानाचा योग्य वापर करून स्वतःचे आयुष्यच बदलून टाकले.