फोटो सौजन्य - Social Media
सन 1956 मध्ये स्थापन झालेल्या महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळाचे 1986 मध्ये विभाजन होऊन स्वतंत्र व्यावसायिक शिक्षण मंडळाची निर्मिती झाली. पुढे राष्ट्रीय कौशल्य विकास आराखड्याअंतर्गत सुधारणा करत, 2022 मध्ये याचे नाव बदलून महाराष्ट्र राज्य कौशल्य, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण मंडळ (MSBSVET) असे करण्यात आले. हे मंडळ सर्टिफिकेट, डिप्लोमा व अॅडव्हान्स डिप्लोमा अभ्यासक्रमांचे संचालन करते, जे विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण व रोजगारासाठी संधी निर्माण करतात.
पूर्वी परीक्षा पारंपरिक पद्धतीने लेखी घेतल्या जात. पण उत्तरपत्रिकांची तपासणी आणि निकाल लागायला सुमारे दोन महिने लागत. या प्रक्रियेत पारदर्शकता आणि जलद निकालाच्या हेतूने जुलै २०२५ च्या परीक्षेत Artificial Intelligence आधारित Proctored प्रणाली वापरून बहुपर्यायी प्रश्न प्रणाली (MCQ) वापरली गेली. त्यामुळे ७ जुलैला संपलेल्या परीक्षांचे निकाल केवळ १० दिवसांत, १७ जुलै २०२५ रोजी जाहीर करण्यात आले.
ही प्रणाली संगणक, मोबाइल, लॅपटॉप यांद्वारे घेतली गेली आणि त्यात कॅमेरा, माइक व स्क्रीन शेअरिंगद्वारे परीक्षार्थ्यांवर लक्ष ठेवण्यात आले. परीक्षेदरम्यान काही २१५२ विद्यार्थ्यांकडून अपप्रवृत्ती (मालप्रॅक्टिस) निदर्शनास आल्याने त्यांचे निकाल राखीव ठेवण्यात आले.
मंडळाच्या नियम २८ नुसार अशा अपप्रवृत्तीत दोषी विद्यार्थ्यांना १ ते ५ परीक्षांपासून प्रतिबंध केला जाऊ शकतो. मात्र, कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या अध्यक्षतेखाली १ ऑगस्ट २०२५ रोजी पार पडलेल्या बैठकीत विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी त्यांना संधी देण्यात यावी, असा निर्णय झाला. त्याअनुषंगाने मंडळाने २३ ऑगस्ट २०२५ रोजी पुरवणी परीक्षा घेण्याचे जाहीर केले आहे. या परीक्षेत राखीव निकाल असलेल्या तसेच अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना अंतिम संधी दिली जाणार आहे. हा निर्णय पारदर्शक शिक्षण आणि विद्यार्थिमैत्र धोरणाचा भाग आहे.