फोटो सौजन्य - Social Media
पारंपरिक शिक्षणपद्धतीत बदल घडवण्यासाठी आणि विद्यार्थ्यांना भविष्यासाठी अधिक सज्ज करण्यासाठी ‘रंगीत’च्या पहिल्या एसईईके शिखर परिषदेचे आयोजन कोहिनूर बँक्वेट्स, दादर येथे करण्यात आले. प्रथम मुंबई एज्युकेशन इनिशिएटिव्ह आणि ओमनीअॅक्टिव्ह इम्प्रूव्हिंग लाइव्हज फाऊंडेशन यांच्या सहकार्याने, तसेच निर्लॉन लिमिटेडच्या मदतीने ही परिषद पार पडली. या परिषदेत मुंबईतील 100 हून अधिक शिक्षक, समुपदेशक आणि शिक्षणाधिकारी सहभागी झाले होते. हे सर्वजण रंगीतने विकसित केलेल्या सामाजिक, भावनिक आणि पर्यावरणीय ज्ञानावर आधारित एसईईके अभ्यासक्रमाच्या अंमलबजावणीसाठी कार्यरत आहेत किंवा त्याची तयारी करत आहेत.
दिवसाची सुरुवात खेळकर ओळखपत्रांमधून झाली, ज्यामध्ये प्राण्यांची चित्रं वापरून सहभागींचे समूह ठरवले गेले. यानंतर डॉ. प्राची जांभेकर (उपआयुक्त, शिक्षण – BMC) यांच्या प्रास्ताविकाने कार्यक्रमाला सुरूवात झाली. परिषदेतील एक महत्त्वाचा भाग म्हणजे “मुलांना भविष्यासाठी कसे तयार करू?” या विषयावर आधारित परिसंवाद. या सत्रात शिक्षणतज्ज्ञ सोनिया रेलिया, मुख्याध्यापक अजय सिंग, समुपदेशक डेलनाज डेलिना आणि ‘प्रथम’ संस्थेच्या फरीदा लांबे यांनी सहभाग घेतला. यामध्ये शिक्षकांनी त्यांच्या अनुभवातून विद्यार्थ्यांमधील भावनिक आणि वर्तनात्मक समस्यांवर प्रकाश टाकला. शिक्षकांसाठी सुरक्षित आधारव्यवस्था किती आवश्यक आहे, यावरही भर दिला गेला.
एक विशेष उपक्रम म्हणून, व्यावसायिक खेळाडूंशी काम करणाऱ्या मानसोपचारतज्ज्ञ मोन ब्रोकमन यांच्या सहकार्याने शिक्षकांसाठी एक चॅटबॉट विकसित केल्याची घोषणा झाली. कार्यक्रमाच्या शेवटी ‘ट्री ऑफ चेंज’ सत्रात प्रत्येक शिक्षकाने विद्यार्थ्यांसाठी अधिक सहृदयी वातावरण तयार करण्यासाठी वैयक्तिक वचनबद्धता दिली.
‘रंगीत’च्या सहसंस्थापक सिमरन मुलचंदानी म्हणाल्या, “जेव्हा आपण शिक्षकांना संधी देतो विचार करण्याची, तेव्हा खरे परिवर्तन घडते.” तर करिश्मा मेनन यांनी, “शिक्षक हे मार्गदर्शकच नव्हे, तर विद्यार्थ्यांचे आधारस्तंभ असतात,” असे सांगितले. ही परिषद शिक्षकांसाठी समर्पित एसईईके समुदायाच्या निर्मितीचा आरंभबिंदू ठरली. भविष्यातील पिढीसाठी शिक्षण अधिक समंजस, संवेदनशील आणि काळानुरूप होण्यासाठी ही दिशा महत्त्वपूर्ण ठरेल.