
income tax
Sports Recruitment: जर तुम्ही क्रीडा क्षेत्रात उत्तम कामगिरी केली असेल आणि सरकारी नोकरीच्या शोधात असाल, तर तुमच्यासाठी एक उत्तम संधी आली आहे. पुणे आयकर विभागाने (Income Tax Department Pune) गुणवंत खेळाडूंसाठी भरती काढली आहे. या अंतर्गत स्टेनोग्राफर ग्रेड २, टॅक्स असिस्टंट आणि एमटीएसच्या एकूण ८५ पदांवर नियुक्त्या केल्या जाणार आहेत. या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया सुरू असून, इच्छुक उमेदवार १५ सप्टेंबर २०२६ पर्यंत ऑनलाइन अर्ज करू शकतील.
या भरतीमध्ये वेगवेगळ्या खेळांमध्ये प्राविण्य मिळवलेल्या खेळाडूंना संधी दिली जाणार आहे. यामध्ये ॲथलेटिक्स, बॅडमिंटन, बास्केटबॉल, बॉक्सिंग, क्रिकेट, हॉकी, कबड्डी, स्विमिंग, टेबल टेनिस, टेनिस, व्हॉलीबॉल, कुस्ती, योगासन आणि पॅरा-स्पोर्ट्ससह १७ खेळांचा समावेश आहे. यामध्ये सर्वाधिक २० पदे ॲथलेटिक्सच्या खेळाडूंसाठी आहेत. त्यानंतर व्हॉलीबॉलची १२ पदे आहेत.
आयकर विभागाच्या या भरतीमध्ये स्टेनोग्राफर ग्रेड २ च्या ६, टॅक्स असिस्टंटच्या ४० आणि एमटीएसच्या ३९ जागा आहेत. स्टेनोग्राफर आणि टॅक्स असिस्टंट पदासाठी पे-लेवल-४ नुसार २५,५०० ते ८१,१०० रुपयांपर्यंत वेतन आहे. तर एमटीएस पद पे-लेवल-१ मध्ये असून, त्याचे वेतन १८,००० ते ५६,९00 रुपये आहे.
स्टेनोग्राफर ग्रेड २: उमेदवार १२ वी पास असावा. या पदासाठी वयोमर्यादा १८ ते २७ वर्षे ठेवण्यात आली आहे.
टॅक्स असिस्टंट: कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. उमेदवाराचे वय १८ ते २७ वर्षांच्या दरम्यान असावे.
एमटीएस (MTS): १० वी पास उमेदवार या पदासाठी अर्ज करू शकतात. या पदासाठी वयोमर्यादा १८ ते २५ वर्षे आहे.
केवळ शैक्षणिक पात्रता पूर्ण करून उमेदवार या भरतीसाठी पात्र ठरणार नाही. अर्ज करणाऱ्या खेळाडूंकडे निर्धारित स्तरावरील क्रीडा प्रमाणपत्राची प्रत असणे आवश्यक आहे. उमेदवाराने देश, राज्य, विद्यापीठ किंवा शाळा संघाकडून निर्धारित आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय, आंतर-विद्यापीठ किंवा खेलो इंडिया स्पर्धेत भाग घेतलेला असावा. उमेदवाराला क्रीडा उपलब्धेशी संबंधित निर्धारित स्वरूपातील प्रमाणपत्रे देखील जमा करावी लागतील. हे प्रमाणपत्र सक्षम अधिकाऱ्याद्वारे प्रमाणित असणे गरजेचे आहे.
उमेदवारांच्या क्रीडा उपलब्धतेच्या आधारे त्यांची प्राथमिकता ठरवली जाईल. आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या खेळाडूंना सर्वात प्रथम प्राधान्य दिले जाईल. यानंतर राष्ट्रीय स्पर्धक, आंतर-विद्यापीठ आणि खेलो इंडिया स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खेळाडूंच्या कामगिरीचा विचार केला जाईल. यानंतर पदासाठी आवश्यक असलेली स्किल टेस्ट घेतली जाईल. स्टेनोग्राफरसाठी डिक्टेशन आणि ट्रान्सक्रिप्शन टेस्ट असेल, तर टॅक्स असिस्टंट पदासाठी डेटा एंट्री स्पीड टेस्ट द्यावी लागेल. निवड प्रक्रियेमध्ये कागदपत्र पडताळणी आणि पोलीस पडताळणीचाही समावेश असेल.
या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना २०० रुपये शुल्क भरावे लागेल. शुल्काचा भरणा ऑनलाइन केला जाईल. पुणे आयकर विभागाच्या या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया १५ ऑगस्टपासून सुरू झाली असून, उमेदवार १५ सप्टेंबर २०२६ पर्यंत ऑनलाइन अर्ज करू शकतात.