
Electrician
Pimpri Chinchwad Govt Jobs: महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्यादितच्या (महापारेषण) अऊदा संवसु विभाग, पिंपरी-चिंचवड अंतर्गत २०२६-२०२७ या सत्रासाठी वीजतंत्री (Electrician) या ट्रेडमधील शिकाऊ उमेदवारांची भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. एकूण २३ रिक्त जागांसाठी ही भरती केली जाणार असून, इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
इलेक्ट्रेशियन या ट्रेडसाठी २३ जागांवर भरती केली जाणार आहे. शासनाच्या नियमानुसार भरती झालेल्या उमेदवारांना १ वर्षाचा प्रशिक्षण कालावधी निर्धारित करण्यात आला असून अर्ज करण्याची अंतिम मुदत १६ ऑक्टोबर २०२६ आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवरांनी लवकरात लवकर अर्ज करावेत.
शिक्षण: उमेदवार महाराष्ट्र राज्य माध्यमिक शालांत परीक्षा (SSC) किंवा तत्सम परीक्षा उत्तीर्ण असावा. तसेच राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद (NCTVT) नवी दिल्ली मान्यताप्राप्त औद्योगिक शिक्षण संस्थेमधून (ITI) वीजतंत्री या व्यवसाय परीक्षेत उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा: १८ ते ३० वर्षे असून मागासवर्गीय उमेदवारांसाठी नियमानुसार ५ वर्षे शिथिलक्षम राहील.
उमेदवारांची निवड एसएससी आणि आयटीआयच्या सरासरी गुणांच्या टक्केवारीनुसार तसेच सामाजिक आरक्षणाच्या अधीन राहून केली जाईल. निवड प्रक्रियेचा भाग म्हणून उमेदवारांच्या प्रत्यक्ष कागदपत्रांची छाननी शनिवार, दि. २४ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ११:०० ते दुपारी ०४:०० या वेळेत अऊदा संवसु विभाग, पिंपरी-चिंचवड (२२० केव्ही उपकेंद्र चिंचवडजवळ, बिजलीनगर) या ठिकाणी पार पडेल. उपस्थित उमेदवारांमधून अंतिम निवड यादी तयार केली जाईल.
इच्छुक उमेदवारांनी शासनाच्या अधिकृत www.apprenticeshipindia.org या संकेतस्थळावर जाऊन वरील आस्थापना क्रमांकावर (E10202700049) आपला ऑनलाईन अर्ज सादर करणे बंधनकारक आहे. १६ ऑक्टोबर २०२६ नंतर प्राप्त झालेल्या अर्जांचा विचार केला जाणार नाही, याची नोंद घ्यावी. अर्जासोबत सर्व आवश्यक गुणपत्रिका आणि कागदपत्रे अचूक व सुस्पष्टपणे अपलोड करणे आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी महापारेषणच्या संकेतस्थळाला भेट द्यावी.